कर्जत : बातमीदार
स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी माथेरान नगर परिषदेने आतापासूनच कंबर कसली आहे. अधिकारी स्वतः प्रत्येक विभागात जाऊन स्वच्छतेविषयी पाहणी करीत आहेत. मागील वर्षी क्रमांक न आल्याने येणार्या सर्वेक्षणात चांगली कामगिरी करून माथेरानचे नाव उंचावण्याचे आव्हान नगर परिषदेच्या प्रशासनावर आहे. त्यासाठी जुन्या झाडांचा सर्व्हे, रंगरंगोटी, जागोजागी स्वच्छता याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. माथेरानला लाखो पर्यटक येतात. पर्यटक फिरताना रिकाम्या प्लास्टिक बाटल्या फेकतात. त्यासाठी नगर परिषदेने प्रत्येक पॉइंटवर कचराकुंड्या उभारल्या आहेत. एखाद्या पर्यटकाने तेथे कचरा टाकला तर कर्मचार्यामार्फत ते उचलायची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही वाहनाला परवानगी नसल्याने मनुष्यबळावर कचरा संकलित केला जातो. आरोग्य विभागातील कर्मचार्यांना स्वच्छता करण्यासाठी वेळा निश्चित केल्या आहेत.खाण्याचे प्लास्टिक रॅपर क्रश करून त्याचीसुद्धा विक्री करून उत्पन्न मिळवले जात आहे. बायोगॅसमध्ये हॉटेलचे शिळे अन्न टाकून त्यापासून पथदिवे उजळले जात आहेत. नगर परिषद हद्दीतील अनेक जुन्या झाडांची माहितीदेखील संकलित केली जात आहे. या सर्व कामांवर स्वतः मुख्याधिकारी देखरेख करत आहेत. स्वच्छता अधिकार्याकडून दररोज प्रत्येक विभागातील स्वच्छतेचा आढावा घेतला जात आहेत. खराब झालेल्या भिंती स्वच्छ करून त्यावर चित्र रेखाटून त्या बोलक्या केल्या जात आहेत.