कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
शहरातील भिसेगाव परिसरात राहणार्या एका धनगराच्या घराशेजारील गोठ्यातून 11 मेंढी, बोकड, बकरी असा एकुण 60हजार रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. कर्जत पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. भिसेगाव येथील जुन्या बस स्टॅन्ड परिसरात राहणार्या दीपक दिगंबर धनगर यांच्या घराच्या बाजुला असलेल्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी 14मार्चच्या रात्री 11 मेढी, बोकड, बकरी असा एकूण 60हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला होता. या प्रकरणी धनगर यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी उपनिरीक्षक सचिन गावडे व अंमलदार भूषण चौधरी तपास करीत होते. त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच शेडुंगफाटा, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले असता गुन्हा करतांना आरोपींनी फोर्ड कंपनीची कारचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून कर्जत पोलिस पुणे येथील नॅशनल इन्फोरमेशन सेंटरची मदत घेवून सदर वाहनापर्यंत पोहचले. त्यानंतर या गुन्ह्यातील आरोपी सुंदरेश वरण गणेश मुदलियार उर्फ अण्णा (रा. सुभाष टेकडी, उल्हासनगर), अकिल मोहम्मद अजीद कुरेशी (रा. कौसा, मुंब्रा) यांना ताब्यात घेण्यात कर्जत पोलिसांना यश आले. अधिक तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच गुन्हा करतांना वापरलेली फोर्ड कंपनीची आयकॉन कार असा एकुण एक लाख 40 हजार रूपये किंमतीचा माल जप्त केला. आरोपींनी धुळे, नाशीक येथेसुध्दा अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे कबुल केले. सदरची कामगिरी कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस अंमलदार सुभाष पाटील, भुषण चौधरी, अश्रुबा बेद्रे यांनी केली.