Breaking News

धोनीला अनोखे द्विशतक साजरे करण्याची संधी

चेन्नई ः वृत्तसंस्था

इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या पर्वासाठी चेन्नई सुपर किंग्स संघ सज्ज झाला आहे. गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएल 2020तील निराशाजनक कामगिरीला मागे सोडून धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार संघाने केला आहे. गतवर्षी आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात धोनीला हा तुझा पिवळ्या जर्सीतील अखेरचा सामना आहे का, असे विचारण्यात आले होते आणि त्यानं निश्चितच नाही असे दिलेले उत्तर सोशल मीडियावर ट्रेण्ड झाले होते. आयपीएल 2021 लिलावातही चेन्नईचे सदस्य ’डेफिनेटली नॉट’ हा संदेश असलेले टी शर्ट घालून आले होते. धोनीचे नेतृत्व अन् कामगिरी या दोन्ही गोष्टींवर यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांचे लक्ष असणार आहे, पण मागील अनेक वर्षांत धोनीने आयपीएलमध्ये नावावर केलेले विक्रम मोडणे इतक्यात शक्य नाही. 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल 2021मधील प्रवासाला सुरुवात होईल. आयपीएलमध्ये सर्वाधिक 216 षटकार मारण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्यानंतर रोहित शर्मा (213), विराट कोहली (201), सुरेश रैना (194) व रॉबिन उथप्पा (163) यांचा क्रमांक येतो.  यंदाच्या आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 200वा सामना खेळण्याचा पराक्रम धोनी करणार आहे आणि असा विक्रम करणारा तो पहिलाच कर्णधार ठरेल. धोनीने कर्णधार म्हणून 188 सामन्यांत 110 विजय मिळवले आहेत. त्यानंतर गौतम गंभीर 129 सामने (71 विजय व 57 पराभव), विराट कोहली 125 सामने (55 विजय व 63 पराभव), रोहित शर्मा 116 सामने (68 विजय व 44 पराभव), अ‍ॅडम गिलख्रिस्ट 74 सामने (35 विजय व 39 पराभव) यांचा क्रमांक येतो. यष्टींमागेही धोनीची कमाल पाहायला मिळते. त्याने आतापर्यंत 204 सामन्यांत 148 बळी (109 स्टम्पिंग व 39 कॅच) टिपले आहेत. दिनेश कार्तिक (140), रॉबिन उथप्पा (90), पार्थिव पटेल (81) व वृद्धीमान ( 76) हे अव्वल पाच यष्टिरक्षक आहेत. धोनीने सर्वाधिक आठ वेळा आयपीएल फायनल खेळली आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून आठ वेळा, तर पुणे सुपर जायंट्सकडून एकदा फायनल खेळली आहे. त्यानंतर सुरेश रैना (8) व रोहित शर्मा (6) असा क्रमांक येतो. आयपीएलमध्ये 100+ सामने जिंकणार्‍या पहिल्या कर्णधाराचा मान धोनीनेच पटकावला आहे. त्याने 110 सामने जिंकले आहेत. गौतम गंभीर 71, रोहित शर्मा 68 आणि विराट कोहली 55 विजयासह अनुक्रमे दुसर्‍या, तिसर्‍या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply