मुंबई ः प्रतिनिधी
वानखेडे स्टेडियमच्या मैदानाची देखरेख करणार्या 10 कर्मचार्यांना आणि संयोजन समितीच्या सहा कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांबाबतची चिंता वाढली आहे, परंतु अल्पसूचनेद्वारे पर्यायी ठिकाणी जैव-सुरक्षित वातावरण निर्मिती करणे अशक्य असल्यामुळे मुंबईतील सामने अन्यत्र हलवता येणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्यासुद्धा वेगाने वाढत असून, शुक्रवारी 47,913 रुग्ण आढळले. या पार्श्वभूमी वर टाळेबंदी किंवा कठोर निर्बंधांचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत 10 ते 25 एप्रिल या कालावधीत होणार्या आयपीएलच्या 10 सामन्यांबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनीही या परिस्थितीबाबत चिंता प्रकट केली आहे. सर्व संघ जैव-सुरक्षित वातावरणात आहेत आणि आयपीएल सामने प्रेक्षकांविना होणार आहेत. त्यामुळे राज्यात टाळेबंदी लागू झाली तरी मुंबईतील सामन्यांबाबत आम्हाला खात्री आहे. 10 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईतील पहिला सामना कार्यक्रमपत्रिकेनुसार होईल,’ असे सूत्रांनी सांगितले. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज या संघांना वानखेडेवर सरावाची परवानगी नाही. दिल्ली आणि पंजाबचा अनुक्रमे ब्रेबॉर्न स्टेडियम आणि शरद पवार अकादमी येथे सराव सुरू आहे. चेन्नईत सामने खेळणार्या कोलकाता नाइट रायडर्सचे नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. स्टेडियमवर सामने सुरू आहेत. गतवर्षीपर्यंत स्पर्धा संयोजनाची जबाबदारी आयएमजीकडे होती, परंतु यंदाच्या वर्षीपासून बीसीसीआय स्वत:च हे कार्य करीत आहे. ‘मुंबईतील परिस्थिती हाताळण्यासाठी आमच्याकडे पुरेशी व्यवस्था आहे. सध्या तरी आम्ही परिस्थितीचा सखोल आढावा घेत आहोत,’ अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.
…तर हैदराबादचा पर्याय मुंबईत
आयपीएलचे सामने खेळविण्यासाठी बीसीसीआयने तयारी केली आहे, मात्र कोरोनास्थिती न सुधारल्यास बीसीसीसीआय मुंबईतील सामने इतरत्र हलवण्याचा विचार करीत आहे. त्या दृष्टीने हैदराबाद हा पर्याय समोर आहे, असे बीसीसीआयच्या एका अधिकार्याने सांगितले.