राज ठाकरेंच्या आरोपांची भाजपकडून पोलखोल
मुंबई : प्रतिनिधी
मोदीमुक्त भारताची हाक देऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या व व्हिडीओंच्या माध्यमातून सरकारच्या कारभारावर आरोप करणार्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपने शनिवारी (दि. 27) त्यांच्याच स्टाइलने प्रत्युत्तर दिले. राज यांचा प्रत्येक आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी फोटो व व्हिडीओचे पुरावे दाखवूनच खोडून काढला. ’राज ठाकरेंचा प्रचार फसला आहे. त्यांचा खोटा प्रचार विकला जाणार नाही,’ असेही शेलार यांनी या वेळी ठणकावून सांगितले.
राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने मुंबईतील रंगशारदा सभागृहात खास मेळावा घेतला. आता बघाच तो व्हिडीओ… खोलो इसका ’राज’… अशी या मेळाव्याची थीम होती. राज यांच्या आरोपांना उत्तर देताना आशिष शेलार यांनी या वेळी भाजप व सरकारची बाजू मांडली. बालाकोट एअर स्ट्राइक, पंतप्रधानांच्या दत्तक गावातील वास्तव यावरही शेलार यांनी खुलासा केला. त्याचवेळी ‘मित्रा तू खरंच चुकलास,’ असे भावनिक उद्गारही राज यांना उद्देशून काढले.
आशिष शेलार म्हणाले…
सोशल मीडियावर राज यांच्या विरोधात काही लिहिले गेल्यास त्यांचे कार्यकर्ते घरी जाऊन मारतात. अशा लोकांनी आम्हाला मुस्कटदाबीविषयी शिकवू नये. भाजपच्या सरकारने मुस्कटदाबी केली असती, तर राज ठाकरे एवढ्या सभा घेऊ शकले असते का?
कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानला दिलेली भेट पुलवामा हल्ल्याशी जोडणारे राज ठाकरे डोक्यावर पडले आहेत.
पक्षाचे संस्थापक नेतेही सोबत नसलेल्या पक्षाचा नेता शेकडो खासदार, आमदार व नगरसेवक असलेल्या पक्षाला प्रश्न विचारतो हे हास्यास्पद आहे.
अकाऊंट, स्त्रोत अशा कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे राज ठाकरे भाजपची बदनामी करीत आहेत. ही जनतेच्या डोळ्यांत धूळफेक आहे.
नोटाबंदी हा कुठलाही झटका आला म्हणून घेतलेला निर्णय नव्हता. नोटाबंदी करण्यापूर्वी बेहिशेबी मालमत्ता जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतरच हा निर्णय घेतला गेला. अर्थव्यवस्थेचा सारासार विचार करूनच नोटाबंदी करण्यात आली होती.