Breaking News

कर्नाळा अभयारण्याला ध्वनीरोधक यंत्रणेचे कवच

अलिबाग ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्यालगत ध्वनीरोधक यंत्रणेचे कवच बसविण्यात आले आहे. अभयारण्यातील पक्षी आणि वन्यजीवांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी हे साऊंण्ड बॅरिअर्स अर्थात ध्वनिरोधक बॅरिअर्स बसविण्यात आले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. हा राष्ट्रीय महामार्ग कर्नाळा पक्षी अभयारण्यातून जातो. त्यामुळे महामार्ग रुंदीकरणादरम्यान अभयारण्यालगतच्या परिसरात विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. महामार्गालगत दोन्ही बाजूस ध्वनिरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. यात अवजड वाहनांची संख्या मोठी असते. त्यांच्या आवाजाचा अभयारण्यातील पशू-पक्षी आणि वन्यजीवांवर परिणाम होऊ नये यासाठी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर महामार्गावर अभयारण्यातील माकडांची वर्दळ कमी व्हावी यासाठीही या यंत्रणेची मदत होणार आहे.
अभयारण्याच्या परिसरात महामार्ग रुंदीकरणाला परवानगी देताना पर्यावरण विभागाने काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. त्यात महामार्गावर ध्वनीरोधक यंत्रणा बसविण्याचाही समावेश होता. त्यानुसार कर्नाळा खिंडीतील संपूर्ण महामार्गाला दुतर्फा ही ध्वनीरोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे वाहनांच्या आवाजांचा पक्षी आणि वन्यजीवांना होणारा त्रासही कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महामार्ग प्राधीकरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत फेगडे यांनी दिली.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply