पाली ः प्रतिनिधी
दीनदुबळे, अनाथ, अपंग, पददलित आणि पीडितांच्या सेवेत संत गाडगे महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यथित केले. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक चळवळ व परिवर्तनाचा लढा अधिक व्यापकपणे उभारला. अज्ञान, अंधश्रद्धा व अस्वच्छतेचे उच्चाटन करणारे विज्ञानवादी समाजसुधारक म्हणजे संत गाडगे महाराज, असे प्रतिपादन सम्यक क्रांती विचारमंचाचे अध्यक्ष मंगेशभाऊ वाघमारे यांनी केले. संत गाडगेबाबा यांच्या 63व्या पुण्यतिथीनिमित्त सम्यक क्रांती विचार मंच आणि ग्रुप ग्रामपंचायत परळी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्या वेळी वाघमारे
बोलत होते. संत गाडगेबाबा म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन व जनजागृती घडवून आणली. त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. समाजातील दांभिकपणा व रूढी परंपरा यावर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली. विज्ञानवादी व डोळस दृष्टिकोन ठेवून जगण्याची त्यांनी शिकवण दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांमधून अनाथ लोकांसाठी अनाथालय, आश्रमशाळा बांधल्या. गाडगे महाराजांचे प्रेरणादायी जीवनचरित्र अभ्यासून त्यांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार कृतिशील कार्य करणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरणार असल्याचे या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले. या वेळी सम्यक क्रांती विचार मंचचे अध्यक्ष मंगेशभाऊ वाघमारे, बाळू करले, मोहन गायकवाड, मीरा मोहन गायकवाड, आकांक्षा देशमुख, पायल वाळके यांसह अनेक जण उपस्थित होते.