कार्ला : प्रतिनिधी
शिवसेना, भाजप व मित्रपक्षांच्या युतीला भरघोस यश मिळू दे, अशी प्रार्थना बुधवारी (दि. 27) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकविरा देवीच्या चरणी केली. उद्धव यांनी सहकुटुंब कार्ला येथील एकविरा मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सकाळी 10.30च्या सुमारास उद्धव ठाकरे यांचे कार्ला गडावर हेलिकॉप्टरने आगमन झाले. पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सोबत होते. त्याचप्रमाणे शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार आदी नेत्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एकविरा देवी आमच्या घराण्याची कुलदैवत आहे. त्यामुळे कोणतेही चांगले कार्य करताना परंपरेनुसार, प्रत्येक वेळी आईचा आशीर्वाद घेतला जातो आणि प्रत्येक कार्यात यश नक्की मिळते हा आमचा अनुभव आहे. त्यानुसार आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीला भरघोस यश मिळू दे, अशी प्रार्थना आईच्या चरणी आम्ही केली.