मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील राजपुरी येथे जंजिरा पर्यटक सहकारी संस्थेच्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, तसेच एक विरंगुळा म्हणून शिडाच्या बोटींच्या शर्यतीचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले होते. या स्पर्धेत शाहनवाज सईद डॉक्टर आणि इरफान आदमने यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. शिडाच्या बोटी या जोरदार वार्याच्या प्रवाहवर चालत असतात. बोटचालक वार्याची दिशा बघून पडदा दोरीच्या साह्याने बदलून बोटीचा वेग वाढवतात. अत्यंत कुशल व नियोजनबद्धरित्या या शिडांच्या बोटी चालवल्या जातात. या स्पर्धेत अनुभव दांडगा असणारा जिंकत असतो. यंदा नुकत्याच ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत 16 बोटमालकांनी भाग घेतला होता. सध्या कोरोनाच्या भीतीने पर्यटकांनी येथे पाठ फिरवली असून, या स्पर्धेवेळी त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. आयोजकांनी कोरोनाच्या सुरक्षिततेसंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्पर्धा मोठ्या उत्साहात यशस्वी केली. स्पर्धेत बोटींचे दोन गट पाडण्यात आले होते. प्रथम गटात शाहनवाज सईद डॉक्टर यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक मुस्ताक फहीम आणि तृतीय क्रमांक मेहबूब हदादी यांनी मिळविला, तर दुसर्या गटात प्रथम क्रमांक इरफान आदम, द्वितीय अझीझ सरदार आणि तृतीय क्रमांक फय्याज हदादी यांना प्राप्त केला. सामाजिक अंतर राखून राजपुरीतील नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद लुटला.