मुंबई : प्रतिनिधी
माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझे यांनी केलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये दोन कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचा आरोप करण्यात वाझेंनी केला आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारने करून दाखवले, असे ट्विट करीत निशाणा साधला आहे. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर जेलिटीनच्या काड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यापासून सुरू झालेल्या सचिन वाझे प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझेनेच आणखी एका पत्रातून स्फोट केलाय. सचिन वाझेने मीडियाला तीन पानांचे पत्र शेअर केले आहे. त्या पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी दोन कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे. त्यानंतर, अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकावर टीकेचे बाण सोडले आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यास कोर्टाने 9 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी ठोठावली आहे. सचिन वाझेने मीडियाला पाच पानांचे पत्र शेअर केले आहे. त्या पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी दोन कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे कथित पत्र 5 पानांचे असून महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याचे नाव या पत्रात असल्याने खळबळ माजली आहे. पवार मला नोकरीवर ठेवू इच्छित नव्हते, मात्र मी पवार साहेबांची समजूत काढेन, असे अनिल देशमुख यांनी म्हटल्याचे लिहिले आहे. पण, सचिन वाझेने दोन कोटी रुपये देण्यास असमर्थता दर्शवली, असेही पत्रात म्हटले आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे धक्कादायक आरोप लावले होते, या प्रकरणात अनिल देशमुखांना खुर्चीवरुन पायउतार व्हावे लागले आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची 15 दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयने दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला होता, मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर धारेवर धरले आहे. आता, पुन्हा एकदा सचिन वाझेंच्या या नव्या लेटरबॉम्बमुळे महाविकास आघाडीला नव्या अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे. त्यातच, भातखळकर यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. पुनर्वसन करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दोन कोटी मागितल्याचा गौप्यस्फोट सचिन वाझेच्या कथित पत्रात करण्यात आला आहे. भ्रष्ट कारभाराचे रोज नवे उच्चांक निर्माण होतायत. ठाकरे सरकारने करून दाखवले यात आता कुणालाच शंका नाही, असा टोला भातखळकर यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.