Breaking News

देशात कोरोना लसींचा तुटवडा नाही -डॉ. हर्ष वर्धन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार लसींचा पुरवठा करीत असल्याचेही ते म्हणाले आहेत.
डॉ. हर्ष वर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 11 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्या वेळी ते बोलत होते. देशात कोरोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच रुग्णसंख्या वाढत असली तरी देशाचा रिकव्हरी रेट 92.38 असून, मृत्यूदर 1.30 टक्के असल्याची माहिती दिली, मात्र बेजबाबदार वर्तन आणि निष्काळजीपणा कोरोनाचा कहर वाढण्याचे कारण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याआधी असलेले धोरण आपण नीट राबविले तर संख्या कमी होईल, असा विश्वासही आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा!
राज्यात अनेक जिल्ह्यांमधील रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याच्या मुद्द्यावरही फडणवीस यांनी सरकारवर ताशेरे ओढले. रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळेच तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर हे कोरोना काळातील अत्यंत महत्त्वाचे औषध असताना राज्य सरकारने याबाबत तत्काळ कारवाई करायला हवी, काळाबाजार रोखला गेला पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
राज्य सरकारने राजकारण बंद करावे : फडणवीस
मुंबई ः महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांसाठी पुरेल इतकाच कोरोना लसींचा साठा शिल्लक असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने या मुद्द्यावर राजकारण बंद करावे, अशी टीका त्यांनी बोलताना केली.
फडणवीस म्हणाले, कोरोना लसीकरणाबाबतचा आरोप चुकीचा आहे. मुळातच आपली क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक लसींचा पुरवठा आपल्याकडे नियमितपणे होत असतो. लसींचा देशभरात पुरवठा होत आहे. देशात सर्वांत जास्त लसी महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत. तीन दिवस पुरेल एवढा साठा संपायच्या आत पुढचा साठा येतो. आपल्याला लसींची साठेबाजी करायची नाहीये.
‘या सगळ्या गोष्टी मीडियात बोलण्याऐवजी केंद्र सरकारशी चर्चा करून का करता येत नाहीत. आपले कुणी जाऊन दिल्लीत किंवा पुरवठादारांकडे जाऊन का बसत नाही. फक्त मीडियात बोलायचे आणि हात झटकायचे हे बंद व्हायला हवे. प्रत्येक वेळी विरोधकांना म्हणायचे राजकारण करू नका आणि मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचे हे बंद करा. लोकांच्या जीवाशी खेळू नका, असेही फडणवीसांनी सुनावले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply