Breaking News

खोपोली सिटी बस स्थानकाची दुरवस्था

खड्डे, चिखल व सांडपाणी तुंबत असल्याने प्रवाशांत संताप

खोपोली : प्रतिनिधी

नागरिकांची नाराजी, नगरसेवकांच्या मागणीनंतरही खोपोली सिटी बस स्थानक समस्यांच्या गर्तेत आहे. खोपोली नगरपालिका परिवहन सेवेचे मध्यवर्ती सिटी बस स्थानक विविध गैरसोयी व समस्यांमुळे विद्यार्थी व नागरिकांच्या संतापाचे कारण बनत आहे.

या स्थानकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे  स्थानकात मोठ्या प्रमाणात सांडपाणी व पावसाचे पाणी साचत आहे, तसेच  सर्वत्र चिखल निर्माण झाल्याने विद्यार्थी व सर्वसामान्य प्रवाशांना बसपर्यंत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे टाळण्यासाठी होत असलेल्या धावपळीमुळे अनेक वेळा  अपघाताच्या घटनांसह विचित्र प्रसंग निर्माण होत आहेत. यामुळे प्रवाशांत नगरपालिकेविरोधात संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे नगरपालिका प्रशासन मात्र करारातील अटी, शर्तीनुसार या स्थानकाची देखभाल व डागडुजीची जबाबदारी परिवहन सेवा ठेकेदारांची असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकत आहे, तर संबंधित ठेकेदार मात्र ‘मला काय त्याचे‘ या भूमिकेतून नफेखोरी करीत आहेत. नगरपालिकेच्या  प्रशासकीय इमारतीला लागूनच असलेल्या खोपोली सिटी बस स्थानकात पडलेले खड्डे, निवारा शेडची दुरवस्था, बिघडलेली सार्जनिक स्वच्छता आणि येथील अन्य समस्यांकडे लक्ष देण्यास नगरपालिका प्रशासन व परिवहन विभागाला वेळ नसल्याचे स्पष्ट होत आहे. ज्येष्ठ नगरसेवक बेबीशेठ सॅम्यूयल, किशोर पानसरे, कुलदीपक शेंडे आदींनी स्थानकातील गैरसुविधांबाबत प्रशासनाने तत्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे, मात्र तरीही काही होत नसल्याने नगरसेवकांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

खोपोली सिटी बस स्थानकाची डागडुजीची जबाबदारी परिवहन सेवा देणार्‍या ठेकेदारांची आहे. नगरपालिकेकडून याबाबत पाठपुरावा सुरू आहे. लवकरच येथील खड्डे बुजवून अन्य गैरसुविधांबाबतही कार्यवाही केली जाईल.

-मोहन  औसरमल, सभापती, परिवहन समिती खोपोली नगरपालिका

सिटी बस स्थानकात मोठमोठे खड्डे व चिखलातून मार्ग काढत बसमध्ये प्रवेश करावा लागतो. नगरपालिका कार्यालय शेजारी असूनही अशी स्थिती आहे, तर शहरातील अन्य समस्यांकडे लक्ष कसे दिले जात असेल याचा हा नमुना आहे.

-प्रवीण क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ता, खोपोली 

पावसाळा सुरू झाल्यापासून आम्हाला दररोज चिखल व खड्ड्यांतील पाण्यातून मार्ग काढून बसमध्ये चढावे लागते. अनेक वेळा चिखल उडून कपडे खराब होतात, तर पाय घसरून विद्यार्थी पडतात, पण याची कोणीही दखल घेत नाही.

-गौरव जगताप, नियमित प्रवासी, खोपोली

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply