पुणे : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका ही परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करीत आहे. महापालिकेच्या वतीने कळंबोली येथे प्रशस्त असे कुस्ती संकुल उभारण्याचे विचाराधीन आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवकांनी बुधवारी (दि. 8) पुणे बालेवाडी येथील सह्याद्री क्रीडा संकुल आणि अमोल बुचडे कुस्ती अकॅडमीला भेट देऊन पाहणी केली.
टोकियो येथे नुकतीच ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा झाली. यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत देशाची मान उंचावली. पनवेलमध्येही अशाच प्रकारे खेळाडू तयार होऊन नावलौकिक मिळवून देण्याच्या द़ृष्टिकोनातून महापालिका अनेक पावले उचलत आहे. याच अनुषंगाने महापालिका हद्दीतील कळंबोली येथे कुस्ती संकुल उभारण्याचे विचाराधीन आहे. या कुस्ती संकुलात खेळाडूंना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कशी असावी, कुस्तीसाठी मॅट आणि मातीचे मैदान कसे असावे, तसेच खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून चांगले प्रशिक्षण कसे देता येईल या संदर्भात पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुणे बालेवाडी येथील सह्याद्री क्रीडा संकुलाला भेट देत संकुलाचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष विजय बराटे यांची भेट घेऊन चर्चा केली, तसेच अमोल बुचडे कुस्ती अकॅडमीला भेट देत तालमीची पाहणी केली.
या वेळी भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल महापालिकेचे नगरसेवक हरेश केणी, अमर पाटील, बबन मुकादम, तसेच संजय चव्हाण, संपती येळकर, पैलवान ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रूपेश पावशे, रामा मानवर, सह्याद्री कुस्ती संकुलचे संदीप पाठारे आदी उपस्थित होते.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …