रायगड जिल्हा नाभिक तरुण संघातर्फे माणगाव तहसीलदारांना निवेदन
माणगाव : प्रतिनिधी
मिनी लॉकडाऊनच्या काळात सलून व ब्युटीपार्लर चालू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी रायगड जिल्हा नाभिक तरुण संघातर्फे माणगांव तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केली आहे. यामध्ये सलून, स्पा, ब्यूटी पार्लर यांच्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. राज्यभरात विविध नाभिक समाज संघटना आणि सलून ब्युटीपार्लर असोशीएशनकडून या निर्णयांचा निषेध केला जात आहे.
मागील 7 ते 8 महिने सलून दुकान बंद राहिल्याने थकीत वीज बिले व घरभाडे, शाळेची फी अद्यापही पूर्ण भरता आलेली नाही. कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनीदेखील पाठ फिरविल्यामुळे गेले वर्षभर नाभिक समाज पुरता हवालदिल झाला आहे. राज्य सरकारकडे वारंवार आर्थिक मदतीची विनंती तथा निवेदन देऊनही आपण अद्याप कसलीही दखल घेतलेली नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाभिक समाजाकडून शासनास नेहमीस सहकार्य राहिले आहे. आजवर सलून, ब्युटीपार्लर यांच्यातून कोरोनाचा संसर्ग झाल्याचे एकही उदाहरण ऐकण्यात आलेले नाही. असे असतानाही पुन्हा लॉकडाऊन लादून सलून, स्पा, ब्यूटी पार्लर यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात नाभिक समाज अल्पसंख्य आहे. बहुतांशी समाजबांधव व महिला यांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पारंपरिक सलून व ब्युटीपार्लर आहे. हेच बंद राहिल्यास नाभिक समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे.
मिनी लॉकडाऊनच्या काळात काही नियम व अटी घालून सलून व ब्युटी पार्लर चालू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा नाभिक तरुण संघातर्फे हे निवेदन माणगाव तहसीलदार भाबड यांना देण्यात आले. या वेळी संघाचे जिल्हाध्यक्ष सुदाम शिंदे, सुरेंद्र पालांडे, दिलीप जाधव, कांता हुजरे, सुरेश यादव, सौरभ पांडे, विलास यादव, शानु शहा, सुयोग यादव आदी पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.