वीकेण्ड लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद; ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
पनवेलमध्ये शासनाने जाहीर केलेल्या दोन दिवसाच्या वीकेण्ड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी बाहेर न पडता घरीच बसण्याचा निर्णय घेतलेला दिसला. नवीन पनवेलमध्ये खांदेश्वर पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावून विनाकारण बाहेर फिरणार्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी वीकेण्ड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्या धर्तीवर पनवेल महापालिका हद्दीतही वीकेण्ड लॉकडाऊन करण्यात आले आहे. शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत दोन दिवसांचा वीकेण्ड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
महापालिका हद्दीत त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद आहेत. पोलिसांनीही बंदोबस्त ठेऊन विनाकारण बाहेर फिरणार्यांवर कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे.
नवीन पनवेल सर्कलला खांदेश्वर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून बाहेर फिरणार्या नागरिकांची कसून चौकशी व खात्री करूनच पुढे सोडण्यात येत होते. नागरिकाने विनाकारण बाहेर फिरून नये, नियमाचे पालन करावे असे आवाहन खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले. नागरिकांनीही बाहेर न जात घरात राहणे पसंद करत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिलेला दिसून आला.
प्रवाशांची तुरळक ये-जा
अनेक दुकानांना शासनामार्फत परवानगी असतानाही त्यांच्याकडे अध्यादेश न पोहचल्याने ती दुकाने सुद्धा बंद होती. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन परिसर येथे तुरळक प्रवाशांची ये-जा होती. एक्स्प्रेस महामार्ग व जुन्या महामार्गावरुन मुंबई-गोवा महामार्गावर सुद्धा तुरळक वाहनांची वाहतूक होती.
उरण बाजारपेठ बंद
उरण : वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता उरण बाजारपेठ शनिवार व रविवार दोन दिवस बाजार पेठ बंद ठेवण्यात आली आहे. उरण शहरात अत्यावशक सेवा वगळता वगळता बाकी दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
उरण शहरात वैष्णवी हॉटेल, राघोबा मंदिर कोट नाका, उरण चारफाटा, चिरनेर, जासई आदी ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस निरीक्षक, सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक, 24 कर्मचारी असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उरण नगर परिषदचे कर्मचारी राघोबा मंदिर कोट नाका येथे बंदोबस्तासोबत होते. आजारी व्यक्तींसाठी औषधे आणण्याच्या कामासाठीच नागरीक उरण बाजारपेठेत येत असल्याचे दिसले.
दोन दिवसाला लावण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनबाबत दुकाने बंद ठेवण्याच्या शासनाच्या भुमिकेबद्दल व्यापार्यांनी नाराजींची भावना व्यक्त केली आहे.