नवी मुंबई : बातमीदार : मदरहूड हॉस्पिटल आणि खारघर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि. 1) तळोजा येथील पापडीचा पाडा मैदानावर क्रीडादिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वच स्तरातील नागरिकांना निरोगी आरोग्याचा संदेश देण्याकरिता स्वतः डॉक्टर आणि कर्मचारी मैदानावर उतरले होते. डॉक्टरांच्या विविध संघांमध्ये या ठिकाणी मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
मैदानी खेळाच्या माध्यमातून होणारा शारीरिक व्यायाम, लवचिकता यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यात मदत होते. दैनंदिन जीवनात व्यायामाला महत्त्व दिल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. त्यामुळे खेळा आणि तंदुरुस्त राहा, असा मोलाचा संदेश देण्यात आला.
खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलच्या हेड ऑफ मेडिकल ऑपरेशन्स ईशा थिबा यांनी सांगितले की, व्यायाम व मैदानी खेळाने शरीरातील स्नायू बळकट होतात. नियमित खेळणे व व्यायाम यामुळे स्नायूंसोबत हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तदाब कमी व्हायला मदत होते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या असून बैठ्या जीवनशैलीमुळेही अनेक आजारांना आमंत्रण दिले जात आहे. स्मार्टफोन व सोशल मीडियामुळे आता मैदानी खेळांकडे पाठ फिरविली जात असून, हे चित्र बदलण्याकरिता डॉक्टरांनी पुढाकार घेत ते मैदानावर उतरले. यामध्ये खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलचे डॉक्टर तसेच कर्मचारी सहभागी झाले होते.