पेण : प्रतिनिधी
मृग नक्षत्राच्या सात दिवसांत चांगला पाऊस पडल्यानंतर पेण तालुक्यात शेतामध्ये पाणी साचले आहे. या अगोदर मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळून जमीन भिजली होती. मे अखेरच्या धूळ पेरणीची कामे पूर्ण करून जूनच्या प्रारंभी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. या पावसाच्या आगमनाने भात शेतीमधील नर्सरी रोपांची उगवण चांगली झाली. मृग नक्षत्राचा प्रारंभ होऊन गेले सात दिवस पेण तालुक्यात दिवसाआड पावसाच्या सरी कोसळत आहेत. येत्या पंधरा दिवसांत लावणीचा हंगाम सुरू होणार असल्याने लागवडीपूर्वी शेती मशागतीची कामे करण्यासाठी शेतकरी शेतात उतरला आहे. मृगाचा पाऊस अनुकूल पडल्याने शेतकर्यांची लगबग सुरू झाली असून, तो शेतातील हिरवेगार बहरलेल्या तरवे अर्थात रोपवाटिका बघून समाधानी झाला आहे. सध्या शेतात उगवलेले तण काढणे, शेतातील बांध मजबूत करण्याच्या कामात शेतकरी गुंतला आहे. पेण तालुक्यात 12 हजार 800 हेक्टर क्षेत्रामध्ये भात लागवड केली जाते. त्यासाठी लागणार्या संशोधित बियाण्यांची पेरणी शेतकर्यांनी केली आहे. त्याची रोपे बहरल्याने शिवाराचे हिरवे सौंदर्य खुलले आहे.