कर्जत : बातमीदार
तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीमधील चौधरवाडी या 45 घरांच्या वस्तीत पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तेथील आदिवासी समाजाच्या महिलांना तब्बल दोन किलोमीटर अंतरावर जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. दरम्यान, या वस्तीसाठी मंजूर झालेली नळपाणी योजना प्रत्यक्षात कधी येणार, याबाबत स्थानिक आदिवासी प्रश्न उपस्थित करीत आहेत.
कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील चौधरवाडी येथील विहीर कोरडी पडली असून, गाव तलावही आटला आहे. त्यामुळे चौधरवाडीमधील आदिवासी महिलांना वाडीमध्ये किंवा वाडीच्या आजूबाजूला पाणी मिळेनासे झाले आहे. त्यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी धामणी गावच्या रस्त्यावर असलेल्या विहिरीवर जावे लागत आहे.
चौधरवाडीपासून ही विहीर सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे. चौधरवाडीतील महिलांना पाणी आणण्यासाठी उन्हातान्हात विहिरीपर्यंत पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे या वाडीतील महिलांनी मोग्राज ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देऊन पिण्याचे पाणी वाडीमध्ये कसे उपलब्ध होईल याची विचारणा केली. त्यानंतर सरपंच रेखा देशमुख आणि उपसरपंच विलास भला यांनी जिल्हा परिषद सदस्या रेखा दिसले यांच्यासह अलिबाग येथे जाऊन चौधरवाडी येथील पाणीटंचाईची समस्या जि. प. पदाधिकारी व अधिकार्यांच्या कानावर घातली. त्यामुळे चौधरवाडी साठी 30 लाख रुपये खर्चाची नळपाणी योजना मंजूर करण्यात आली. या नळपाणी योजनेचे काम लवकर सुरू करावे आणि चौधरवाडीमधील आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी कर्जत तालुका आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भरत शिद यांनी केली आहे.