Breaking News

बायोमेट्रिक थम्ब पद्धत थांबवावी

रास्तभाव धान्य दुकानदारांचे कर्जत तहसीलदारांना निवेदन

कडाव : प्रतिनिधी

कोरोना विषाणू संक्रमण काळात रेशन दुकानातील ई पॉज मशिनवरील बायोमेट्रिक थम्ब पद्दत तात्काळ थांबवावी व कार्डधारकांचा धान्य कोटा कमी करु नये, अशी मागणी कर्जत तालुका रास्तभाव धान्य दुकानदारांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य शासनाने मागील वर्षापासून रास्तभाव धान्य वितरण व्यवस्थेत बायोमेट्रिक पद्दती सक्तीची केली आहे. मात्र कर्जत हा डोंगराळ तालुका असल्यामुळे येथे नेटवर्कची गंभीर समस्या आहे. त्यामुळे ई पॉज मशिनवर ऑनलाईन ट्रांजेक्शन होत नाही. सध्या कोरोनाचे संक्रमण वेगाने सुरु असून, रेशन दुकानदार आपली व कार्डधारकांचीही काळजी घेत आहेत. लाभार्थी कार्डधारक कामधंद्यानिमित्त सातत्याने बाहेर जात असतात. त्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात येतात. अशा परिस्थितीत रास्तभाव धान्य वितरण व्यवस्थेतील ई पॉज मशिनद्वारे थम्ब पद्दत थांबणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

कर्जत तालुका रास्तभाव धान्य दुकान चालक मालक संघटनेने हे निवेदन सोमवारी (दि. 12) तहसीलदारांना दिले. या वेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, उपाध्यक्ष रत्नाकर बडेकर, सचिव सतिश हाडप, राजाराम भोईर, प्रकाश सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या कोरना रुग्णसंख्या वेगाने वाढत असून, मृत्यू दरातही वाढ झाली आहे. ते लक्षात घेता रेशन दुकानात सुरु असलेली ई पॉज बायोमेट्रिक थम्ब पद्धत थांबविणे गरजेचे आहे. तरच दुकानदार व लाभार्थी कार्डधारक सुरक्षित राहतील.

-मनोहर पाटील, अध्यक्ष, रास्तभाव धान्य दुकान चालक मालक संघटना, कर्जत

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply