अलिबाग : प्रतिनिधी
फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 20 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सुधागड येथील दुय्यम निबंधक जितेंद्र वाईकर याला अटक करण्यात आली आहे . रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कामगिरी बजावली.तक्रारदार यांच्या मुलाच्या नावे पाली येथे फ्लॅट आहे. या फ्लॅटचे दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रेशन करायचे होते. या कामासाठी वाईकर याने त्याचे हस्तक महंमद गुलाम शेख व राजेश राठोड यांच्या माध्यमातून 24 हजारांची लाच मागितली होती. चर्चेअंती त्यात 20 हजारांवर तडजोड झाली. या संदर्भात तक्रारदार यांनी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार केली होती. शुक्रवारी ही रक्कम देण्याचे निश्चित झाले होते त्यानुसार रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. शुक्रवारी दुपारी आपल्या कार्यालयात ही रक्कम वाईकर याच्या वतीने राजेश राठोड याने स्वीकारली आणि रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात अडकला. या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र वाईकरसह कार्यालयातील खासगी कर्मचारी हरेष ठाकूर, महंमद गुलाम शेख, राजेश राठोड या त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.