पनवेल : प्रतिनिधी
कंटेन्मेंट झोन किती दिवस राहील, कंटेन्मेंट झोनमधून कोणास वगळण्यात येते, कंटेन्मेट झोनमध्ये येण्या-जाण्यास कोणास परवानगी आहे, असे अनेक प्रश्न, शंका नागरिकांच्या मनात येत असतात, या नागरिकांच्या शंकाचे निरसन, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे महानगरपालिका व्हॉट्सअॅपवर तयार केलेल्या ग्रुपच्या माध्यमातून देत आहे. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिका व कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ आहे. महानगरपालिका गृह निर्माण सोसायट्यांवर लक्ष ठेवून त्यांना केवळ कोरोनाबाधित सदनिका अथवा विंग, सूक्ष्म कोरोना बाधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन), मोठे कोरोना बाधित क्षेत्र (मॅक्रो कंटेन्मेंट झोन) अशा तीन प्रकारामध्ये विभागणी करते आहे. अनेकदा या कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात. त्यांची उत्तरे देण्यासाठी महानगरपालिकेने कंटेन्मेंट झोन झालेल्या सोसायट्यांकरिता व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. संबधित सोसायटींमधून एका जबाबदार व्यक्तीस (अध्यक्ष, खजिनदार, सचिव) या ग्रुपमध्ये समाविष्ट केले जात असून अशा सोसायटींना एक लिंक दिली जात आहे. या लिंकवर क्लिक केले असता कंटेन्मेंट झोनविषयी माहिती देणार्या व्हॉट्सअॅप ग्रुपशी ती जबाबदार व्यक्ती जोडली जाते. पाचपेक्षा जास्त रूग्ण ज्या सोसायटीमध्ये आढळतील अशा सोसायटींच्या जबाबदार व्यक्तीस सदर ग्रुपमध्ये अॅड करून त्यांना कंटेन्मेंट झोनशी संबंधित सर्व माहिती दिली जाते. तसेच संबधित सोसायटीच्या रहिवाश्यांना काही शंका, समस्या असतील तर त्यांनी सोसायटीमधील या ग्रुपशी संबधित व्यक्तीशी संपर्क साधून आपले प्रश्न ग्रुपवर मांडावेत, महापालिकेतील संबधित अधिकारी या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. महानगरपालिकेच्या नोडप्रमाणे खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल असे पाच व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. कंटेन्मेंट झोन झालेल्या सोसायटीचे अध्यक्ष, खजिनदार, सचिव किंवा तत्सम जबाबदार व्यक्ती अशांना या व्हॉट्सअॅप ग्रुपशी जोडायचे असल्यास महानगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. महानगरपालिका सध्या टेस्टींग, ट्रॅकींग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीभर देत आहे. या त्रिसूत्रीच्या माध्यमातून रूग्ण संख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.