Breaking News

डेक्कन क्वीन कर्जतला थांबविण्याची मागणी

कर्जत : प्रतिनिधी

खंडाळा घाटातील मंकी हिल ते कर्जतदरम्यान मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या विविध तांत्रिक कामांमुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत मुंबईकडे जाणार्‍या काही एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाकरमानी व व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. या मार्गावरील प्रगती एक्स्प्रेस रद्द असेपर्यंत पुण्याहून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन कर्जतला थांबवावी, अशी मागणी मनसेने मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. पावसाळ्यामध्ये मंकी हिल ते कर्जतदरम्यानच्या रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रकार घडले, तसेच पावसाच्या पाण्यामुळे लोहमार्गाखालील माती, खडी वाहून गेल्याने रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. त्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात हा मार्ग सुरू करण्यात आला होता, पण आता रेल्वे प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता 5 ऑक्टोबरपासून या रेल्वेमार्गावर पुन्हा काही तांत्रिक कामे हाती घेतली आहेत. या कामामुळे पुणे ते मुंबईदरम्यान धावणार्‍या काही गाड्या रद्द केल्या, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये प्रगती एक्स्प्रेस या गाडीचासुद्धा समावेश आहे. परिणामी पुण्याहून कर्जतला येण्याकरिता व जाण्याकरिता पनवेल, नेरळ, बदलापूर, अंबरनाथ किंवा कल्याण आदी ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत. प्रगती एक्स्प्रेसच्या थोडा वेळ आधी डेक्कन क्वीन मुंबईकडे रवाना होते, मात्र तिचा कर्जतला थांबा नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना लोणावळ्याला उतरून अन्य मार्गाने कर्जतला यावे लागते. त्यात त्यांचा वेळ आणि पैसाही खर्च होतो. प्रगती एक्स्प्रेस रद्द आहे तोपर्यंत डेक्कन क्वीन कर्जतला थांबवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागल्याने महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी मध्य रेल्वेचे डेप्युटी चीफ ऑपरेटिंग मॅनेजर (कोचिंग) जॉर्ज इपन आणि सीनिअर डिव्हिजनल ऑपरेटिंग मॅनेजर (कोचिंग) शिवराज यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आणि त्यांना सविस्तरपणे वस्तुस्थिती कथन केली. त्यावर या अधिकार्‍यांनी डेक्कन क्वीन कर्जतला थांबविण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असा शब्द दिला आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply