Breaking News

पूर्वग्रहातून गुंतवणुकीसाठी कंपन्या निवडणे घातक का आहे?

आपल्याच मनात काही गृहीतके तयार करून काही जण शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी कंपन्यांची निवड करत असतात, पण ही पद्धत एखाददुसर्‍या वेळी चालून जात असली तरी तिच्यावर दीर्घकाळ विसंबून आपले गुंतवणुकीचे निर्णय धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे कंपनीचा अभ्यास करण्याच्या पद्धतीला पर्याय नाही

मागील आठवड्यात आपला बाजार काहीसा नरम राहिला, अनेक राज्यांमध्ये पुन्हा अंशतः टाळेबंदी, वाढलेली महागाई, महामारीचा वाढता प्रादुर्भाव, घसरलेली निर्यात आणि त्याचबरोबरीनं तगड्या आयटी कंपन्यांचे आलेले बर्‍या निकालांचे आकडेदेखील बाजाराला तारू शकले नाहीत, मात्र दुसर्‍या बाजूस अमेरिकी बाजारांनी नवीन उच्चांक स्थापन केले. नेहमीच अमेरिकी बाजाराच्या हातात हात घालून चालणारा आपला बाजार यावेळेस मात्र फारकत घेताना दिसला. नेहमीच्या वृत्तीप्रमाणं अनेकांनी अमेरिकन बाजार पडत नाहीये म्हणून भारतीय बाजारदेखील पडणार नाही अशा गृहीतकांवर स्वार होऊन पहिल्याच दिवशी डुबकीचा अनुभव घेतला. अगदी अनेक वेळा गुंतवणुकीच्या बाबतीतही अशाच काही प्रवृती आपल्याला आढळून येतात, मात्र एक चांगला गुंतवणूकदार होण्यासाठी अशा वृत्ती समजून त्यांवर मात करणं हे नक्कीच यशस्वी गुंतवणूकदाराचं रूप मानलं जातं.

अर्थशास्त्रात दिल्याप्रमाणं, स्थिरकन पूर्वग्रह असल्यानं गुंतवणूकदारांसाठी आपली गुंतवणूक एखाद्या अवमूल्यित कंपनीत करणं किंवा उर्ध्व मूल्यातील गुंतवणूक लागलीच काढून घेणं यासारखे चुकीचे आर्थिक निर्णय घेण्यास कारणीभूत ठरू शकते. हा पूर्वग्रह, आर्थिक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये खरेदी-विक्रीचा निर्णय आणि वस्तूंच्या किमती यासारख्या मुख्य आकडेवारीपासून रोख प्रवाह आणि सुरक्षेच्या किमतींसारख्या अंतिम उत्पादनापर्यंत कोणत्याही ठिकाणी उपस्थित राहू शकतो, परंतु एक गुंतवणूकदार म्हणून, आपल्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्यं, आपली भावनिक स्थिती आणि मनोवैज्ञानिक जडण यांच्या आधारे आपण गुंतवणूकीचा निर्णय घ्यावयास हवा. यासाठी आधी एका व्यवहारातील उदारणानं ही गोष्ट उमजून घेऊ…

आपण प्रथम एखाद्या ब्रॅण्डचा एक टी-शर्ट ज्याची किंमत एक हजार रुपये असल्यास जर दुसर्‍या ब्रॅण्डच्या टी-शर्टची किंमत 700 रुपये असल्यास, आपण दुसर्‍या शर्टकडं पाहताना स्वस्त म्हणून पाहतो आणि 1000 वाल्याकडं महाग म्हणून आणि आपल्या मनात द्वंद्व सुरू होतं व आपण निर्णय घेऊ शकत नाही, मात्र पुढील वेळेस हाच 1000 रुपये ब्रँडवला टी-शर्ट 900 रुपयांना मिळाला तर आपण झटकन विचार न करता (मागच्या वेळेपेक्षा) स्वस्त आहे म्हणून घेऊन टाकतो. आणि यावरच अनेक दुकानदार आपली खरी कमाई करतात.  इथं आपण पाहिलेली पहिली किंमत आपल्या मतावर अयोग्यपणे प्रभाव पाडते. जेव्हा लोक निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत असतात तेव्हा ते नेहमी संदर्भ किंवा प्रारंभिक बिंदू म्हणून या पूर्वग्रहाचा कळत-नकळत वापर करून त्याभोवती केंद्रवर्ती होऊन जातात. अगदी हीच गोष्ट आपल्याला एखाद्या शेअरच्या बाबतीत पाहायला मिळते. उदाहरण द्यायचे झाल्यास, सर्वांच्याच परिचयाच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचा भाव मागील अनेक वर्षं 1000 रुपयांच्या खालीच घुटमळत असायचा. जियो आल्यानंतर नंतर त्याचा भाव पुढील एक वर्षभर 1000 – 1400 मध्ये दोलायमान राहिला. आता ज्यांना या शेअरचा भाव 1000 रुपयांच्या खाली पाहायची सवय झाली त्यांनी त्याचा भाव 1000 रुपयांच्या वर गेल्यावर त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार सोडून दिला. आता मात्र तेच गुंतवणूकदार त्याच्या 2369 या उच्चांकानंतर आता 1800-1900 रुपयांवर म्हणजे स्वस्त झाला म्हणून तो घ्यायचा विचार करत आहेत. या द्विधा परिस्थितीची कारण म्हणजे आपण आपल्याच मनात केलेले आडाखे 800चा शेअरभाव 1000 झाल्यास तो महाग आहे, आणि 2300 वरून 1800 आला की तो स्वस्त आहे. अगदी याच्या उलट परिस्थिती म्हणजे ‘गमावल्याची भावना’. अगदी वरील उदाहरणच पाहायचे झाल्यास, ज्यांनी रिलायन्सचे शेअर्स 1000 रुपयांना, 1400 रुपयांना खरेदी केले नाहीत, त्यांना जसजसा त्याचा भाव 2000 पुढं जाऊ लागला तेव्हा अनेक साक्षात्कार झाले की आता ’जियो’ टेलिकॉम युगातील क्रांती आहे आणि पुढील दशकभर याचाच बोलबाला राहणार आणि याचा भाव 3000-5000 होणार अशी भावना होऊन मग अनेकवेळा अशा परिस्थितीत आपण आजूबाजूला पाहतो तर समजतं की अनेकांनी यामध्ये आधीच गुंतवणूक केलेली आहे,  मग 1400 रुपयांवर महाग वाटणार्‍या शेअरची 2200-2300 रुपयांवरून उड्या मारून खरेदी केली जाते. यालाच म्हणतात की असा शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये नसल्याची खंत वाटून चढ्या भावात केलेली खरेदी. गमावलेल्या संधीच्या चुकीच्या धारणेनंतर या परिस्थितीचा सामना केला जातो.

अगदी यानंतरचा अनुभव म्हणजे, एखाद्या शेअरचा भाव मागील दोन-तीन महिन्यांत 20-30 टक्क्यांपर्यंत कमी झाल्यामुळं या शेअरची लागलीच खरेदी केली जाते. इथं गुंतवणूकदार ठराविक काळातील घट तपासण्यासाठी मागील 52 आठवड्यांतील किमतीच्या गृहीतकांनुसार त्याचं मूल्यमापन करत असतो, ना की त्या कंपनीमध्ये असलेल्या अधिमूल्याप्रमाणं. प्रत्यक्षात, शेअरभावात वाढ व घसरण होण्याची अनेक कारणं असू शकतात हे प्रत्येक गुंतवणूकदारानं लक्षात घेतलं पाहिजे.

यानंतरची बाब म्हणजे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन-पाच वर्षांच्या भावी मूल्यांकनासह एखादा शेअर 100 रुपयांवर खरेदी केला असेल आणि अभ्यासापोटी त्याचं भावउद्दिष्ट हे जर 200 रुपये असेल तर सहाच महिन्यांमध्ये त्या शेअरच्या भावानं 20-25 टक्के परतावा दिल्यास तूर्त त्यामध्ये विक्री करण्यास पुष्टी दिली जाते. (‘आत्ता तर नफा पदरात पाडून घेऊ, पुढचं पुढं पाहू’ , असं समजून.. आणि अशांनं तो शेअर पुन्हा खाली आल्यास त्याकडं दुर्लक्ष केलं जातं की, यामध्ये एकदा नफा मिळालाय आणि आता तो पुन्हा खरंच वरती जाईल का? ही शंका स्वतःच उत्पन्न करवून घेऊन.)

अशाप्रकारे गुंतवणूकीमध्ये गृहीतकं करण्याच्या हेतूनं कोणतेही स्पष्ट सूत्र उपलब्ध नसलं तरी, स्वअभ्यास, जागरूकता ह्या मूल्यांकन संरक्षणासंबंधीत पहिली ओळ म्हणून काम करू शकतात. शेअरभावाचा मागील कल, त्याच्या खरेदी किमतीपासून स्वतःस अलिप्त ठेऊन त्याऐवजी मूलभूत गोष्टींवर कंपनीच्या उचित मूल्यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे.

* सुपरशेअर – ’एसबीआय कार्ड्स’

मागील आठवड्यात हा शेअर जरी सुपर शेअर नसला तरी येणार्‍या काळांत हा सुपरशेअर ठरेल अशा घडामोडी दोन दिवसांपूर्वी जागतिक बाजारात घडलेल्या आहेत. त्याआधी ह्या शेअरबद्दल जाणून घेऊयात. शेअरचं नाव आहे ’एसबीआय कार्ड्स’. मागील वर्षात मार्चमध्ये 755 रुपयांवर असलेल्या प्राथमिक समभाग किंमतपट्ट्यावरून हा शेअर आज वर्षभरानंतर 970 रुपयांवर व्यवहार करत आहे. 1998 मध्ये क्रेडिट कार्ड बाजारात उतरलेली ही कंपनी आज बाजारातील अग्रगण्य कंपन्यांमधील एक आहे. सध्या या कंपनीत एसबीआय ही 74 टक्के हिस्सा राखून आहे, तर अमेरिकन कार्लील ही संस्था उर्वरित 26 टक्के हिस्सा बाळगून आहे. क्रेडिट कार्ड व्यवसायाबरोबरच, इतर पेमेंट्स व इन्शुरन्स क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. अमेरिकेतील बँकिंग प्रमुख, सिटी बँकेनं गुरुवारी जाहीर केलं की, जागतिक रणनीतीचा एक भाग म्हणून ते भारतातील ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडतील. त्यांच्या व्यवसायात क्रेडिट कार्ड, किरकोळ बँकिंग, गृह कर्जे आणि संपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश आहे. आपसूकच याचा अप्रत्यक्ष फायदा भारतातील सर्वांत मोठ्या बँकेला आणि पर्यायानं या कंपनीस होऊ शकतो या अंदाजानं या एकमेव कंपनीचा शेअर एका दिवसात आर्थिक कंपन्यांमधून सर्वांत जास्त म्हणजे सात टक्क्यांहून अधिक उसळला. एकूणच कंपनीचा विस्तार आणि जोड बँकेची साथ पाहता दीर्घ मुदतीसाठी 1200 हे उद्दिष्ट ठेवता येऊ शकतं.

– प्रसाद ल. भावे (9822075888)

sharpfinvest@gmail.com

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी साता समुद्रापार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहचले असून या सुसज्ज …

Leave a Reply