Breaking News

‘दिबा’साहेब सर्वांचे स्फूर्तीस्थान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भूमिपुत्रांचे कैवारी, प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते संघर्षमूर्ती दि. बा. पाटील यांच्या 97व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या संग्राम निवासस्थानी शुक्रवारी (दि. 13) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी जाऊन अभिवादन केले. या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘दिबा’साहेबांची स्मृती सर्वांना स्फूर्ती देणारी असल्याचे अधोरेखित केले.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, जे. डी. तांडेल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, श्रुती म्हात्रे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ‘दिबां’साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून आदरांजली वाहिली.

या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘दिबा’साहेबांच्या कार्याचा उल्लेख करीत आणि आठवणींना उजाळा देत त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असल्याचे नमूद केले. ते पुढे म्हणाले की, 13 जानेवारी हा संघर्षमूर्ती लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांचा जन्मदिवस. या निमित्ताने दरवर्षी आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतो आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत आमची चर्चा होते. अत्यंत कौटुंबिक वातावरणात एकमेकांची जिव्हाळ्याने विचारपूस होत असते. लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब हे नेहमीच लोकांसाठी लढले आहेत. संघर्षमूर्ती म्हणून त्यांचे कार्य सर्व समाजाला प्रेरणादायी आहे आणि त्या अनुषंगाने विमानतळाला त्यांचे नाव तसेच त्यांचे कार्य जागतिक स्तरावर पोहचणार आहे. माझ्या लहानपणापासून ते आमचे नेते राहिले आहेत. त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही कायम काम करीत आहोत. त्यामुळे लोकांसाठी जगायची भावना घेऊन आणि त्यांचा आदर्श घेऊन कितीही संकटे आली तरी डगमगायचे नाही ही त्यांची शिकवण वाटचालीत मौलिक ठरली आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply