गेला पंधरवडाभराहून अधिक काळ कोरोना आघाडीवरील देशातील परिस्थिती दिलासादायक राहिली आहे. भारताचा रिकव्हरी रेट ८४ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. अॅक्टिव्ह केसेसचे प्रमाण दहा लाखांच्या खाली राहिले आहे. कोरोना आघाडीवरील परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच सर्वच आर्थिक क्षेत्रांतही उलाढालींनी वेग घेतल्याचे दिसू लागले आहे.हे दिलासादायक बदल टिकवायचे असतील तर येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपल्याला सर्व दक्षता पूर्वी इतक्याच जबाबदारीने पाळायच्या आहेत.
भारतातील कोरोना विषाणूचा फैलाव गेले सलग तीन आठवडे ओसरताना दिसतो आहे. या काळातील कोरोनासंबंधी आकडेवारी पाहता देशाने बहुदा कोरोनाचा ‘पीक’ (कळस) पार केला असावा अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही आठवड्यां तील आपली कोरोनासंबंधी आकडेवारी निश्चितपणे दिलासादायक आहे. पण निव्वळ आपल्या अफाट लोकसंख्येमुळे आपण काही आठवड्यांमध्ये अमेरिकेला मागे टाकून कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसलेला जगभरातील क्रमांक एकचा देश बनण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास तरी निश्चितपणे परिस्थिती सुधारताना दिसते आहे. सध्या देशात ९ लाख ३४ हजार ४२७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. म्हणजे आजवरच्या एकूण कोरोना केसेस विचारात घेता निव्वळ १४.११ टक्के केसेस आता अॅक्टिव्ह आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्रातील परिस्थिती मात्र अद्यापही चिंताजनकच आहे. गेल्या २४ तासांतील ७४ हजार ४४२ नव्या केसेसपैकी १२ हजाराहून अधिक केसेस एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्याखालोखाल दहा हजारांहून अधिक केसेस कर्नाटकातून नोंदल्या गेल्या आहेत. कालच्या दिवसभरात ९०३ कोरोना मृत्यूंची नोंद झाली. त्यापैकी ३६ टक्के म्हणजे ३२६ महाराष्ट्रातील आहेत. त्या खालोखाल ६७ मृत्यू कर्नाटकातील आहेत. देशपातळीवर मात्र सलग गेले दोन आठवडे अॅक्टिव्ह केसेस दहा लाखांच्या खाली राहिल्या आहेत. नव्या केसेसपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने अधिक राहिली आहे. त्यामुळेच देशाचा रिकव्हरी रेट ८४.३४ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. केंद्राने आखून दिलेले जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे, रुग्णांचा संपर्क शिताफीने शोधून काढण्याचे तसेच सर्व हाॅस्पिटलांमधून एकाच दर्जाचे उपचार उपलब्ध करून देण्याचे धोरण या यशामागे आहे. अर्थात कोरोना महामारी संपायला अद्याप अवकाश असला तरी परिस्थिती सुधारु लागल्यामुळे आर्थिक व्यवहारांना वेग देण्यासाठी सर्वांनीच जोर लावण्याची गरज आहे. सामाजिक अंतर राखण्यापेक्षाही आता योग्य दक्षतेने स्वसंरक्षण करण्याची खबरदारी घेतली पाहिजे. सप्टेंबर महिन्यातील आर्थिक आकडेवारी जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा दर्शवित असल्याचे केंद्रीय अर्थ खात्याने नुकतेच म्हटले आहे. काही क्षेत्रांमध्ये तर मागील वर्षांपेक्षाही आता बरी परिस्थिती दिसते आहे. अर्थातच त्यामुळे लाॅकडाऊनपोटी देशाच्या अर्थव्यवस्थेला बसलेला जबरदस्त फटका नाकारता येणार नाही. लाॅकडाऊनमुळेच महामारीला वेळीच अटकाव करणे आपल्याला शक्य झाले आहे. केंद्राने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेमुळेही देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत झाली आहे. विशेषत: देशाच्या ग्रामीण भागात दुचाकी, तीनचाकी व खाजगी वाहनांची मागणी ट्रॅक्टर विक्री बरोबर वाढल्याने ते परिस्थिती सुधारत असल्याचे द्योतक मानले जात आहे. खरीपाचे कृषी उत्पन्नही वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सगळीकडेच अनलाॅकमुळे आंतरराज्य प्रवासावरील निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळेल. एकंदर परिस्थिती दिलासादायक असली तरी येत्या काळातील सणासुदीचे दिवस तसेच बिहारमधील निवडणुकांमुळे केसेस वाढण्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.