मुरुड : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले असून, सध्या या आरोग्य केंद्राची रंगरंगोटी सुरू आहे.
गेल्या जून महिन्यातील चक्रीवादळाचा तडाखा बसून आगरदांडा आरोग्य केंद्राची परिस्थिती अतिशय दयनिय झाली होती. मात्र त्याकडे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले होते. या आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम तातडीने करावे, यासाठी समाजसेवक अरविंद गायकर यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्याचे वृत्त ‘दै. रामप्रहर‘ मध्ये 13 एप्रिल रोजी प्रसिध्द होताच या आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आगरदांडा (ता. मुरूड) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 21 गावांना आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यात येतात. गेल्या जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळात या केंद्राच्या इमारतीचे छप्पर उडून गेले होते, त्यामुळे इमारती बाहेरच रुग्ण तपासणी करण्यात येत होती. ऑपरेशन थेटर कधी कोसळेल, ते सांगता येत नव्हते, शौचालये तुंबली होती.
पाण्याची सोय नव्हती. या आरोग्य केंद्राच्या इमारतीची पडझड होऊन दहा महिन्यांचा कालावधी उलटला तरीही जिल्हा परिषद त्याकडे लक्ष देत नव्हती. त्यामुळे येथे येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत होता. या प्राथमिक आरोग्य केंद्राची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा समाजसेवक अरविंद गायकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला. त्याचे वृत्त दै. रामप्रहरमध्ये प्रसिध्द होताच संबंधीत विभागाला जाग आली. त्यांनी तातडीने आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर पत्रे बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, रंगकाम सुरु आहे. आरोग्य केंद्रातील वीज वाहिन्यासुद्धा सुस्थितीत करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अलिबागचे प्रांत अधिकारी प्रशांत ढगे यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून तेथील ओपीडी, हिरकणी कक्ष, स्त्री जनरल वार्ड, पुरूष जनरल वार्ड, ऑपरेशन थेटर, लसीकरण कक्ष, कार्यालय व औषधसाठा यांची पाहणी केली. तसेच त्यांनी सबंधित ठेकेदारास सदरचे काम ताडीने पूर्ण करण्यास सांगितले. या वेळी मुरूड तहसीलदार गमन गावित, नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, तालुका आरोग्य अधिकारी.चंद्रकांत जगताप, वैद्यकीय अधिकारी विकासनी चव्हाण, संजीव दुंबे, मंडळ अधिकारी विजय म्हापुसकर उपस्थित होते.