Breaking News

महाडमधील शेकडो प्राथमिक शाळा मोडकळीस

रायगड जिल्हा परिषदेकडे दुरुस्तीचे प्रस्ताव धूळ खात पडून

महाड : प्रतिनिधी

तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या इमारतींची सध्या बिकट अवस्था झाली आहे. 2018 पर्यंत जवळपास 43 प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत होत्या. त्यातच गतवर्षी निसर्ग चक्रीवादळात सुमारे 100 शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. मागणी करूनही दुरुस्ती प्रस्ताव अद्याप जिल्हा परिषदेकडे खितपत पडून आहेत. शिवाय दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या दुरुस्तीबाबत शासन स्तरावर उदासीनता आहे.

महाड तालुक्यातील अनेक गावे डोंगर – दर्‍यात वसलेली आहेत. या गावांतील प्राथमिक शाळांच्या इमारती आज निधीअभावी बिकट अवस्थेत आहेत. यातील कांही शाळांची दुरुस्ती झालेली असली तरी आजही शेकडो शाळा मोडकळीस आल्या आहेत. या शाळा इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव रायगड जिल्हा परिषदेकडे धूळ खात पडून आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीदेखील उदासीन असल्याने शाळा दुरुस्तीबाबत पाठपुरावा केला जात नाही.

महाड तालुक्यातील अनेक शाळा शंभर वर्षांपेक्षा जुन्या आहेत. थातुरमातुर दुरुस्ती करून, आहे त्या परिस्थितीतच शिक्षकदेखील शिकवित आहेत. शिरवली शाळेची भिंत कोसळून अनेक वर्षे झाली तरी दुरुस्ती झालेली नाही तर आंबेशिवथर शाळेची इमारतदेखील गळकी झाली आहे. खळई प्राथमिक शाळेची इमारत दुरुस्त करून मिळावी म्हणून ग्रामस्थांनी मागणी अर्ज केला आहे. निधी उपलब्ध होत नसल्याने खर्डी आणि नगरभुवनमधील शाळा ग्रामस्थांनीच दुरुस्त केल्या आहेत.

महाड तालुक्यातील सुमारे 43 शाळा इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव 2018 पर्यंत पाठवण्यात आले आहेत. सर्व शिक्षा अभियान बंद असल्याने महाड पंचायत समितीकडून हे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले आहेत. हिरकणीवाडी, नगरभुवन, वाकी, कातीवडे, गावडी, साकडी, कोंडीवते, कोळोसे, वाकी, मांडले, रेवतळे (उर्दू), किये, बीजघर, कसबे शिवथर आदी शाळांचा त्यात समावेश आहे. त्यातच निसर्ग चक्रीवादळात सुमारे 100 शाळा मोडल्या गेल्या. या शाळांचे दुरुस्ती प्रस्तावदेखील पाठविले आहेत, मात्र कोविड परिस्थिती आणि कमी पटसंख्या यामुळे या शाळांना निधी मिळण्यात अडसर येत आहे. ग्रामिण भागात पटसंख्या रोडावली असल्याने दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना निधी मिळणे कठीण झाले आहे.

षटकोनी शाळादेखील धूळ खात पडून

महाड तालुक्यात ग्रामिण भागात सर्व शिक्षा अभियानातून षटकोनी पद्धतीच्या शाळा बांधण्यात आल्या होत्या. कोकणातील भौगोलिक स्थितीचा विचार न करताच या शाळा बांधल्याने आणि स्थानिक शिक्षण समितीने दिलेल्या ठेकेदाराकडून या शाळा इमारती उभ्या राहिल्याने तसेच अल्पावधीतच ऐन पावसाळ्यात गळती लागल्याने या शाळा धूळ खात पडून आहेत.

महाड तालुक्यातील जवळपास 43 जुन्या शाळा मोडकळीस आल्या आहेत तर निसर्ग चक्रीवादळात दोन वेळा 100 पेक्षा अधिक शाळांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवले आहेत.

-सचिन पवार, बांधकाम अभियंता, सर्व शिक्षा अभियान, महाड

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply