अलिबाग : प्रतिनिधी
रायगड पोलिसांनी आताकारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली. गेल्या 25 दिवसात करोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्या 20 हजार जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या बेजबाबदार नागरिकांकडून तब्बल 50 लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे.रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. करोनाबाधितांची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. दोन हजारपेक्षा अधिक लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या करोनाचे 13 हजार सक्रीय रुग्ण आहेत. यातील तीन हजार लोकांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सुविधांवरचा ताण प्रचंड वाढला आहे. प्राणवायू, रेमडेसिविर औषधांचा तुटवडा राज्यभरात जाणवत आहे. रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांना करोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. मात्र यानंतरही काही नागरिकांचा बेजबाबदारपणा सुरुच आहे. सार्वजनिक मुखपट्टीचा वापर न कऱणे, आंतर नियमांचे उल्लंघन करणे, संचारबंदी आणि जमावबंदीच्या आदेशाची पायमल्ली करणे यासारखे प्रकार सुरुच आहेत. पोलिसांनी बेजबाबदार नागरिकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. आगंतूक फिरणार्यांची धुलाई न करता दंडात्मक कारवाईकडे पोलिसांचा कल आहे. 1 ते 25 एप्रिल या कालावधीत मुखपट्टी विना फिरणार्या सहा हजार 317 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 13 लाख 99 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. संचारबंदी आणि जमावबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी 456 गुन्हे दाखल करण्यात आले. यातील 22 गुन्हे न्यायालयात शाबित झाले. त्यात 44 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर 434 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. निर्बंधाच्या काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या 13 हजार 599 जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 40 लाख 18 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांकडून शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे आणि नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. मात्र लोकांकडून नियमांचे उल्लंघन सुरु असल्याने पोलिसांकडून व्यापक कारवाई सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे, कारण नसतांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी केले आहे.