Breaking News

रायगडला पावसाचा तडाखा

प्रमुख नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात सह्याद्रीच्या पट्ट्यात पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सावित्री, काळ व कुंडलिका या नद्यांनी सोमवारी (दि. 8) धोक्याची पातळी ओलांडली. पावसामुळे महाड आणि माणगाव तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक ठिकाणी पाणी घुसून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड शहरात पाणी घुसले होते. दस्तुरी नाका ते नाते खिंड रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. कुंडलिका नदीनेही धोका पातळी ओलांडल्याने रोह्यात काही घरांमध्ये पाणी घुसले होते. काळ नदी दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे माणगाव तालुक्यातील इंदापूर, साई, गोरेगाव, निजामपूर, विळे, पाटनुस, भिरा, पळसगाव, लोणेरे, खरवली, मोर्बा भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. खोपोली शहर परिसरासह खालापूर तालुक्यातदेखील काही ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली.

पावसाचा जोर सह्याद्रीच्या पट्ट्यात जास्त आणि किनारपट्टीवर कमी दिसून आला. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणीपातळी वाढल्याने प्रशासन त्यावर लक्ष ठेवून आहे. येत्या 48 तासांत कोकणात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंत 34.68 मिमीच्या सरासरीने 554.80 मिमी पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून 8 जुलैपर्यंत 20920.80 मिमी पाऊस पडला आहे. एकूण पर्जन्यमानाच्या 42.25 टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सोमवारी 45.90च्या सरासरीने 734.40 मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्याच्या एकूण पर्जन्यमानाच्या 37.10 टक्के पाऊस पडला आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply