रोहे : प्रतिनिधी
तालुक्यातील पास्को कंपनीतील भंगारावरून रविवारी दुपारी सुतारवाडी येथे 11 चारचाकी गाड्या व सहा टेलरची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, घटना घडलेल्या सुतारवाडी या ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. माणगाव तालुक्यातील विळे भागाड औद्योगीक वसाहतीमधील पोस्को कंपनीतील भंगार घेवून तळोजा नवी मुंबई येथे चाललेला टेलर रविवारी दुपारी सुतारवाडी येथे अडवून त्याच्या काचा व हेडलाईट फोडण्यात आल्या होत्या. त्याच बरोबर 11 चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर सुतारवाडी परिसरात तुफान हाणामारी झाली होती. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टेलर चालकाच्या फिर्यादीनुसार फिर्यादीला धमकाणे, टेलरचे हेडलाईट व काचा फोडल्याप्रकरणी दहा आरोपींच्या विरोधात कोलाड पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसर्या फिर्यादीनुसार फार्महाऊसमध्ये लाठ्याकाठ्या, तलवारी तसेच दगड व बियरच्या बाटल्या फेकून हल्ला करणे, फार्महाऊस तसेच 11 चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्याप्रकरणी 21 आरोपीच्या विरोधात कोलाड पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात भादविक 143,147,148,149,452,24, 36,447,427,506,188,269,270, शस्त्र अधिनियम 1959, 4/25, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 51, साथरोग अधिनियम कलम 3,4 व कोविड अधिनियम कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव करीत आहेत.