सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांच्या आजूबाजूच्या परिसरात सॅनिटायझेशन करण्यात यावे, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लसीकरण सेंटरच्या आजूबाजूच्या परिसराचे सॅनिटायझेशन करण्याची मागणी प्रभाग समिती ’ड’च्या सभापती सुशिला जगदिश घरत यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना कार्यवाहीसाठी निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशभर सर्वत्र कोरोना (कोविड- 19) विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असून, या विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये याकरिता केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. याच धर्तीवर पनवेल महापालिका प्रशासनामार्फत योग्यती कायदेशीर उपाययोजना केली जात आहे, मात्र महापालिका हद्दीतील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महापालिकेमार्फत करण्यात येणार्या लसीकरणाबाबतची सद्यस्थिती पाहता प्रभागातील नागरिकांना लस टोचून घेण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1, 2, 3, 4, 5 व 6 येथे जावे लागते. तेथे नागरिकांना लसीकरणाचे टोकन घेण्याकरिता ताटकळत रांगेत तासन्तास उभे राहावे लागते. त्याचबरोबर लसीकरण केंद्रावर दिवसाला 100 ते 125 नागरिकांचे दैनंदिन लसीकरण करण्यात येत आहे, परंतु केंद्राबाहेर 300 ते 400 नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. लसीकरण केंद्राच्या गेटवर व आजूबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणांवरून नागरिक ये-जा करीत असतात. त्यामुळे सर्व केंद्रांच्या ठिकाणी दैनंदिन औषध फवारणी (सॅनिटायझेशन) केल्यास तेथे नागरिकांना सुरक्षित लसीकरण करणे सोयीचे होईल.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता औषध फवारणी (सॅनिटायझेशन) करणे अत्यंत गरजेचे आहे. या विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन पनवेल महापालिका हद्दीतील सर्व आरोग्य केंद्रांच्या लसीकरण सेंटरच्या आजूबाजूच्या परिसरात सॅनिटायझेशन करण्याकरिता महापालिका प्रशासनामार्फत संबंधित विभागाच्या अधिकारीवर्गाला आदेश देण्यात यावे, असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.