Breaking News

रानसई धरण आटले; 20 दिवसांचाच पाणीसाठा शिल्लक

उरण ः वार्ताहर

उरण तालुक्यातील एमआयडीसीच्या रानसई धरणाची पातळी अतिशय खालावली असून फक्त 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने चिंतेचे वातावरण आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पाण्याची पातळी एक मीटरने खालावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 दिवसांचा पाणीसाठा कमी आहे. परिणामी एमआयडीसीने आता रोज 6 एमएलडी पाणी सिडकोकडून घेण्यास सुरुवात केली आहे.

उरण तालुक्याला आणि येथे असलेल्या प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी 1979च्या दशकात हे धरण बांधण्यात आले होते. रानसईच्या निसर्गरम्य अशा डोंगर कपारीत हे धरण बांधले आहे. सुमारे 6.8 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे धरण आहे. धरणात 10 मिलियन क्यूबिक मीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे, मात्र गेल्या वर्षी पाऊस लवकर गेल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला. सध्या या धरणात 3 मेअखेर 2.821 मिलियन क्यूबीक मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा पाणीसाठा 3.245 एवढा होता. यातील 1.528 पाणीसाठा मृतसाठा (पिण्यास अयोग्य) आहे. सध्या रानसई धरणात फक्त 1.293 एमसीएम पिण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे.

रानसई धरणातून उरण तालुक्यातील 24 ग्रामपंचायती, उरण नगर परिषद आणि ओएनजीसी, बीपीसीएलसारख्या इतर मोठ्या प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. उरण तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास झाल्याने येथे येणार्‍या प्रकल्पांना या धरणातूनच पाणीपुरवठा केला जात आहे. धरणातून दररोज सुमारे 35 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, मात्र या वर्षी धरणातील पाणी पातळी लवकर कमी झाल्याने एमआयडीसीने उरणला पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोच्या हेटवणे धरणातील पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या दररोज 6 एमएलडी पाणी सिडकोकडून घेण्यात येत असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली.

सिडकोकडून 10 एमएलडी पाण्याची मागणी केली होती, मात्र सिडको सध्या दररोज 6 एमएलडी पाणी देत असून उरणच्या लोकांची गरज भागविण्यासाठी हे पाणी पुरेसे असून रानसई धरण आणि सिडकोचे पाणी मिश्र करून उरणकरांना देण्यात येत आहे. साधारण मेअखेरपर्यंत पुरेल एवढेच पाणी रानसई धरणात शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उरणच्या नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच सिडकोकडून आणखी जास्त पाण्याची मागणी करून उरणकरांची तहान भागवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply