Breaking News

काशीद जेट्टीच्या कामाला वेग

मुरुड तालुक्यातील काशीद या ठिकाणी केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत 112 कोटी रुपये खर्च करून भव्यदिव्य जेट्टी बांधण्याच्या कामाला वेग आला असून सन 2021 अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर जलमार्गाने केवळ दोन तासांत काशीद येथून मुंबई गाठता येणार आहे.

पर्यटनस्थळ म्हणून काशीद जगप्रसिद्ध आहे. येथे  पर्यटकांची नेहमी मोठी गर्दी असते. लाखो पर्यटक मुंबईमार्गे काशीद समुद्रकिनारी फिरण्यासाठी येतात. जेट्ट्ीचे काम पुर्ण झाल्यानंतर रस्ताप्रवास टाळून पर्यटकांना थेट जलमार्गाने काशीद गाठणे खूप सोपे व सोयीचे होणार आहे. सदरची जेट्टी दुहेरी हेतू ठेऊन बांधण्यात येत आहे. काशीद जेट्टी येथून प्रवासी वाहतुकी बरोबरच रो-रो सेवेद्वारे वाहनांची वाहतूक करता येणार आहे. त्यामुळे पर्यटक काशीद, मुरूडकडे अधिक आकर्षित होतील.

काशीद समुद्रकिनारी भव्य -दिव्य जेट्टी उभारण्याच्या कामाला भारतीय जनता पार्टीच्या काळात मंजुरी मिळाली होती. रायगड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या जेट्टीचा पायाभरणीचा कार्यक्रम मोठ्या थाटात झाला होता. केंद्र सरकारकडून या जेट्टीसाठी मोठा निधी प्राप्त करून देण्यात आला होता.

मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनार्‍याचा समावेश आंतरराष्ट्रीय ठिकाणात झाल्याने येथे नेहमी देशी-विदेशी पर्यटकांचा राबता असतो. सुट्टीच्या काळात रोज किमान 10 हजारांपेक्षा जास्त तर वर्षभरात सात लाखापेक्षा जास्त पर्यटक काशीद समुद्रकिनार्‍यावर येतात. त्यांना सध्या बोटीने मुंबई येथून मांडवा (ता. अलिबाग) व त्यानंतर वाहनाने रस्त्यामार्गे काशीदला यावे लागते. या प्रवासाला किमान तीन तास लागतात. प्रवासाचे अंतर कमी व्हावे व मुंबईतून पर्यटकांना थेट काशीदला जलद गतीने पोहचता यावे, यासाठी 2018 मध्ये केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत काशीद येथे मोठी जेट्टी विकसित करण्यास मान्यता मिळून निधीही प्राप्त झाल्याने सध्या जेट्टी उभारणीच्या कामाला गती आली असून वर्षाच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून देण्यात आली आहे.सध्या या जेट्टीचे काम 60 टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच जलवाहतुकीसाठी ही जेट्टी उपलब्ध होणार असल्याने काशीद व मुरुड परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास होणार आहे.

सध्या जेट्टी उभारण्याच्या कामाने वेग धरला असून सदरचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचा मेरीटाइम बोर्डाचा इरादा आहे. रो रो सेवेसाठी खोल समुद्रात टे-टे-स्पॉर्ट अंथरण्यात येतात, त्याची सुयोग्य मांडणी केली जाते.सिमेंटचे टे-टे-स्पॉर्ट बनवण्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचा थर समुद्रात टाकण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली. मे अखेरपर्यंत टे-टे-स्पॉर्टचे काम पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. टे-टे-स्पॉर्ट अंथरून झाल्यावर पुढील काम जलद गतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

काशीद येथील ब्रेकवॉटर बंधार्‍यासह रो-रो जेट्टी, पॅसेंजर जेट्टी निर्माण करण्यासाठी 2018 साली सागरमाला योजनेतंगत केंद्र शासनाकडून 112 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मांडवा जेट्टीच्या धर्तीवरच काशीद जेट्टीचे काम पूर्ण करण्यात  येत आहे. आतापर्यंत काशीद जेट्टीचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात टे-टे-स्पॉर्ट अंथरणे व दगडांचा भराव पूर्ण करण्यात आला  आहे. टे-टे-स्पॉर्ट बनवणे हे खूप अवघड काम असते. परंतु संबंधित ठेकेदाराने बारशीव येथे सिमेंटचे टे-टे-स्पॉर्ट बनवल्यामुळे कामाचा कालावधी कमी होण्यास मदत झाली आहे. 2021 अखेर अथवा 2022 च्या मार्च महिन्यापर्यंत या जेट्टीचे काम पुर्ण होईल, असे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी सांगितले.

काशीद जेट्टीमुळे होणारे फायदे

मुंबई-काशीद प्रवासाचे अंतर कमी होणार

स्थानिकांना मोठा रोजगार प्राप्त होणार

ऑटो रिक्षा, मिनी डोअरने मुरुडकडे येण्याची व्यवस्था झाल्याने रिक्षाचालकांच्या रोजगारात वाढ होणार

समुद्रकिनार्‍यावरील हॉटेल, लॉजिंग याचा फायदा होणार

समुद्रकिनारी पर्यटकांना सुविधा देणार्‍या टपरीधारकांच्या व्यवसायात वृद्धी

आद्योगिकरणाला चालना मिळून बेरोजगारीचे प्रमाण घटणार

मुरूड परिसरात नवीन उद्योगधंदे येण्यास मदत होणार

-संजय करडे, खबरबात

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply