पनवेल मनपाच्या सभेत मंजूर झाला होता ठराव
पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी विरोधी पक्षनेते, माजी खासदार, भूमिपुत्रांची अस्मिता असलेले प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, ही भूमिका पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या संदर्भात यापूर्वीच पनवेल महानगरपालिकेच्या जुलै 2018च्या सर्वसाधारण सभेत नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
पनवेल परिसराच्या जडणघडणीमध्ये लोकनेते दि. बा. पाटील यांनी मोलाचे योगदान दिले आणि पनवेलला विशेष नावलौकिक प्राप्त करून दिला. त्यांनी पनवेलच्या विकासाकरिता व नियोजनाकरिता अत्यंत भरीव असे कार्य केले आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव पनवेल महापालिकेच्या 13 जुलै 2018 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन उपमहापौर चारुशीला घरत यांनी सभागृहात मांडला होता. हा ठराव घेण्यासंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका सुशीला घरत, दर्शना भोईर, कुसुम म्हात्रे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अमर पाटील यांनी प्रस्ताव सूचना केली होती. त्यानुसार सभागृहात सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला होता.
मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबईची निर्मिती केली गेली. याकरिता हजारो शेतकर्यांची जमीन संपादित करण्यात आली. शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोलाने घेणार्या सिडकोविरोधात प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांनी जोरदार लढा दिला. त्यामुळे साडेबारा टक्के भूखंडाचे तत्व लागू राज्यासह देशभरात झाले. ‘दिबां’नी स्थानिकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा अधिकार व सन्मान दिल्याने अशा नेत्याच्या त्यागाची दखल घेण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव पनवेल महापालिकेत करण्यात आला.
दरम्यान, नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नुकताच सिडको संचालक मंडळाच्या वतीने पारित करून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. यामुळे विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ‘दिबां’चे नाव विमानतळाला देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनीही आग्रही भूमिका मांडली आहे. त्याचबरोबर कामोठे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करून ‘दिबां’चेच नाव विमानतळाला द्यावे, अशी मागणी करण्यात आली. वेळ पडल्यास पराकोटीचा संघर्ष करून वाट्टेल ते मोल देण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. एकंदर ’दिबां’साठी काहीही करण्याची आक्रमक भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतल्याचे दिसून येत आहे.