अॅड. मनोज भुजबळ यांची मागणी
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका हद्दीतील वकील, त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या कर्मचार्यांना कोविड लसीकरणासाठी प्राधान्य देण्याची मागणी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र देऊन केली आहे.
देशात कोविड-19ची दुसरी लाट आल्याने केंद्र आणि राज्य सरकारने कोविड लसीकरण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. पनवेलमध्ये जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आहे. येथे मोठ्या प्रमाणात वकील, त्यांचे कर्मचारी व अशिलांचा वावर असतो. पनवेल वकील संघटनेचे जवळपास एक हजार सदस्य आहेत. मा. आयुक्त आरोग्य सेवा यांनी 1 एप्रिल 2021 रोजी सर्व महापालिका आयुक्तांना त्यांच्या हद्दीत येणार्या सर्व न्यायिक अधिकारी, वकील व कर्मचार्यांना लसीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत आदेश पारित केले आहेत.
मुंबई महापालिकेने वकिलांना, त्यांच्या कुटुंबीयांना आणि कर्मचार्यांना ओळखपत्र दाखवून लसीकरण करण्यास प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे पनवेल महापालिकेने पनवेल मनपा हद्दीत, ग्रामीण भागात अथवा कार्यालय असणार्या वकिलांना, त्यांच्या कुटुंबीयांना आणि कर्मचार्यांना ओळखपत्र दाखवून लसीकरण करण्यास प्राधान्य देण्याची मागणी अॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्तांकडे केली आहे.