Breaking News

महाड-म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे काम ठप्प; प्रवाशांसह वाहनचालक त्रस्त

महाड : प्रतिनिधी

महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ – पंढरपूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. अवजड वाहनांमुळे त्यात अधिक भर पडली असून, नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत आहेत.म्हाप्रळ-पंढरपूर हा राज्यमार्ग महाडजवळून गेला आहे. महाड तालुक्यातील वराठीपासून सुरूवात होवून पुढे तालुक्यातील शिरगाव, खरवली, माझेरी मार्गे हा राज्यमार्ग पुणे जिल्हा हद्दीत जातो. महाड हद्दीतील रस्त्याची देखभाल, दुरूस्ती ही महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होती, मात्र आता हा मार्ग महामार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे. महामार्ग विभागाने या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन वर्षापुर्वी सुरूवात केली. मात्र कोरोना संक्रमण वाढल्याने हे काम बंद ठेवले गेले. त्यातच हे काम ठेकेदाराकडून काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे गेली अनेक महिने हे काम ठप्प आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी जागोजागी केलेले खोदकाम, मोर्‍यांची अर्धवट कामे प्रवाशांना तसेच वाहन चालवताना धोकादायक ठरत आहेत. महाड तालुक्यातील शिरगाव, सव गावापर्यंत रस्ता काही अंशी बरा आहे, मात्र त्या पुढे कोणता खड्डा चुकवायचा, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. हा रस्ता रत्नागिरी जिल्ह्याला जोडला गेला असल्याने आणि त्या जिल्ह्यातील सिमेवरील गावांचा अधिक संबध महाडला असल्याकारणाने बाजारपेठ आणि शिक्षण यासाठी या रस्त्यावर कायम वर्दळ असते. प्रवासी वाहतूक करणार्‍या खाजगी वाहनांबरोबरच पुणे, रायगड, आणि मुंबईकडे जाणार्‍या एसटीच्या गाड्यादेखील या परिसरातून ये-जा करत असतात. या मार्गावर महाड तालुक्यातील गोमेंडी, वराठी, जुई, चिंभावे, तुडील, सव, रावढळ, महाप्रळ आदी गावे येतात. या परिसरातील नागरिकांचा महाड शहराशी थेट संबध येत असल्याने प्रतिदिन वाहनांची ये – जा मोठी असते. त्यात या विभागात वामणे, हे कोकण रेल्वेचे स्थानकदेखील आहे. मात्र रखडलेल्या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. स्थानिक लोकप्रतिनींधींनी याकडे कानाडोळा केला आहे.

महाडपासून म्हाप्रळपर्यंतचा प्रवास अत्यंत धोकादायक झाला आहे. जागोजागी खड्डे आणि केलेले खोदकाम यातून वाट काढताना कसरत करावी लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.

-बिलाल मुकादम, ग्रामस्थ, म्हप्रळ, ता. महाड

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply