सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ड्राइव्ह इन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई व नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पनवेल महापालिका क्षेत्रातही ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करावे, अशा मागणीचे पत्र भाजप सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांना दिले होते. या पत्राच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यासंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना निवेदन देऊन मागणी केली आहे
या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिका क्षेत्रात गेल्या काही आठवड्यांपासून लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. परिणामी महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव हा काहीसा कमी होताना दिसत आहे, परंतु जसे व्यवहार सुरू होतील आणि अनलॉक होत जाईल तसे पुन्हा कोरोनाचे संकट बळावण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबतदेखील सूचना पहायला मिळत आहे. कोरोनासोबत जगणे हे आपल्याला शिकावेच लागणार आहे आणि त्याकरिता आपल्या क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाने कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे आहे.
महापालिकेची लोकसंख्या बघता होणारे लसीकरण व सध्या कार्यरत असलेले केंद्र अपुरी आहेत असे लक्षात येते. आपण लसींचा पुरवठा वाढवावा, तसेच लसीकरण केंद्रही वाढविणे आवश्यक आहे. खारघर येथील लिटिल वर्ल्डस मॉल अथवा सेंट्रल पार्कचा परिसर आणि पनवेल येथील ओरियन मॉल अथवा वडाळे तलावाच्या परिसरात हे लसीकरण केंद्र सुरू करता येऊ शकते, असे परेश ठाकूर यांनी नमूद केले आहे.
लसीकरणाची प्रक्रिया ही जितकी सोपी आणि सुटसुटीत राहील तितका त्याला प्रतिसाद जास्त मिळेल. ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र हे त्या दृष्टीने एक पाऊल असणार आहे. त्यामुळे मुंबई व नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पनवेल महापालिका क्षेत्रात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करावे, जेणेकरून ज्येष्ठ व दिव्यांगांना याचा फायदा होईल, तसेच हा उपक्रम सुरू केल्यास असे नागरिक जे कोरोनाच्या भीतीने लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी घाबरत आहेत तेदेखील लसीकरण करायला पुढे सरसावतील, असेही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.