Breaking News

अनिल देशमुखांच्या अडचणीत झाली वाढ

ईडीनेही दाखल केला गुन्हा

मुंबई ः प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आता अंमलबजावणी आयुक्तालयाने (ईडी) गुन्हा दाखल केलेला आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर सीबीआय म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानेही गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार सीबीआयने त्यांच्याविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात हा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती, तसेच सीबीआयला कठोर कारवाई करण्यापासून मज्जाव करण्याचीही मागणी केली, मात्र सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केली आहे.
देशमुख यांच्यावर भ्रष्ट कारभाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी सचिन वाझे आणि संजय पाटील या पोलीस अधिकार्‍यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, त्याचबरोबर अनेक अधिकार्‍यांच्या कर्मचार्‍यांच्या बदल्या ते भ्रष्ट मार्गाने करीत होते, असे आरोप आहेत.
काही दिवसांपूर्वी अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यानंतर त्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणांवरून महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप करणारे खळबळजनक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply