Breaking News

संसर्ग घटतोय, मात्र मृत्यूदर वाढतोय!; नवी मुंबईत कोरोनाबाबत किंचित दिलासा आणि चिंताही

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कडक संचारबंदीनंतर नवी मुंबईतील कोरोना रुग्णवाढ घटली असून दैनंदिन 1441 पर्यंत गेलेली बाधितांची संख्या आता शंभर ते दोनशेच्या घरात आली आहे. त्यामुळे 15 टक्क्यांवर पोहचलेला कोरोना लागण दर आता पाच टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, हे शहरासाठी दिलासादायक चित्र आहे. असे असले तरी कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मे महिन्यात प्रतिदिन सरासरी 9 जणांचा मृत्यू होत असून, ते प्रमाण कमी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 15 फेब्रुवारीपासून शहरात पुन्हा रुग्णवाढ सुरू झाली. तीन महिन्यांत या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आतापर्यंतच्या कोरोनाकाळातील सर्व उच्चांक मोडीत काढले. शहरातील एका दिवसातील नव्या रुग्णांची सर्वोच्च संख्या गेल्या वर्षी 20 ऑगस्टला 477 होती, तर या वर्षी एप्रिलमध्ये ही संख्या 1441 वर पोहचली होती. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अपुरी पडत होती. खाटांचा तुटवडा, प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला होता. तीन टक्क्यांवर असलेला कोरोना लागण दर 15 टक्क्यांपर्यंत पोहचला होता. त्यानंतर शासनाने कडक संचारबंदी लागू केल्यानंतर संसर्ग हळूहळू कमी होत गेला आहे. 1441 पर्यंत गेलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता शंभर ते दोनशेच्या घरात आली आहे. त्यामुळे 15 टक्क्यांवर गेलेला कोरोना लागण दर आता पाच टक्क्यांपर्यंत खाली आला आहेे. दुसरी लाट थोपविण्यात यश येत असले तरी दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एप्रिलमध्ये 194 जणांचा मृत्यू झाला होता. मे महिन्यात प्रतिदिन सरासरी नऊ जणांचा मृत्यू होत आहे. दहा दिवसांमध्ये 90 जणांचा मृत्यू झाला आहे. 80 टक्के मृत्यू 50 पेक्षा जास्त वयोगटातील आहेत. लहान मुले व तरुणांचे प्रमाण 20 टक्के आहे. तरुणांची सरासरी कमी असली तरी दुर्लक्ष करण्यासारखी नाही. दहा वर्षांपर्यंत 10 जणांचा, 20 ते 30 वयोगटातील 24 व 30 ते 40 वयोगटातील 82 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

शहरातील कोरोना लागण दर 15 टक्क्यांपर्यंत गेला होता; परंतु आता परिस्थिती नियंत्रणात असून लागण दर पाच टक्क्यांवर आला आहे. सातत्याने दैनंदिन रुग्णवाढ कमी झाली तर लवकरच मोठा दिलासा मिळेल, परंतु नागरिकांनी अधिक सहकार्य करून नियमावली पाळण्याची आवश्यकता आहे.

अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका

पन्नाशीच्या पुढील रुग्णांवर लक्ष

रुग्णवाढ कमी झाल्याने दिलासा मिळाला असला तरी मृत्यूदर जास्त आहे. यामुळे महानगरपालिका प्रशासनाने 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍या रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मृतांमध्ये 80 टक्के प्रमाण या वयोगटातील आहे. यामुळे या वयोगटातील रुग्णांनी घरी उपचार न घेता रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply