उरण : वार्ताहर
सध्या राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाला असताना उरण तालुक्यातील जासई येथे 150 कोंबड्या दगावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, पशुसंवर्धन खात्याने मृत कोंबड्यांचे पंचनामे करून नमूने तपासणीसाठी पाठविले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायत हद्दीतील प्रदीप घरत यांच्या 150 कोंबड्या रविवार ते सोमवारी अचानक मृतावस्थेत आढळून आल्या. याबाबत घरत यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्यांना माहिती दिली. अधिकार्यांनी मृत कोंबड्यांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली, पण या घटनेची माहिती वार्यासारखी परिसरात पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोंबड्या बर्ड फ्लूने तर दगावल्या नसतील ना, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
‘नागरिकांनी घाबरून जाऊ नये’
या घटनेसंदर्भात उरण तालुका पशुसंवर्धन अधिकारी ए. जी. दांडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जासईतील दगावलेल्या कोंबड्यांचा पंचनामा करण्यात आला आहे, परंतु या कोंबड्या बर्ड फ्लूने नाही, तर हवामानातील बदलामुळे त्यांना इतर आजारांची लागण होऊ दगावल्याची शक्यता आहे. मृत कोंबड्यांचे नमूने तपासणीसाठी पाठविले आहेत तसेच ज्या कोंबड्या जिवंत आहेत त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. उरण तालुक्यात बर्ड फ्लूूचा अद्याप शिरकाव झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.