नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीर याने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 29 वर्षीय आमीर सध्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये राहत आहे. तेथील नागरिकत्व स्वीकारून तो आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहत आहे.
मोहम्मद आमीरने निवृत्ती जाहीर करताना पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनावर गंभीर आरोपही केले. त्यामुळेच या देशासाठी खेळण्याची इच्छा राहिली नसल्याचे आमीरने स्पष्ट केले. सध्याचे संघ व्यवस्थापक बदलल्यानंतर देशाकडून पुन्हा खेळेन, असेही तो म्हणाला होता. दरम्यान, आमीर सध्या लंडनचे नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी तो पाकिस्तानचे नागरिकत्व सोडण्यासही तयार आहे. तो ब्रिटिश नागरिक झाला, तर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पात्र ठरू शकतो.
मला लंडनमध्ये राहण्याची परवानगी मिळाली आहे. येथे मी क्रिकेटचा आनंद लुटत आहे. अजूनही काही वर्षे क्रिकेट खेळण्याचा माझा प्रयत्न आहे. माझी मुले इंग्लंडमध्ये वाढत आहेत आणि येथेच शिक्षण सुरू आहे, असे आमीर म्हणाला.