1 जूनपर्यंत निर्बंध कायम; नवीन नियमावली जाहीर
मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत असलेले निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविण्यात आले आहेत. राज्य सरकारने यासंदर्भातील नियमावलीही जारी केली आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणार्या प्रवाशांसाठी आरटी पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. बुधवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली होती.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये काही निर्बंध वाढविण्यात आले आहेत. 15 मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत हे नवे निर्बंध लागू राहणार आहेत. ब्रेक द चेनच्या नव्या नियमावलीनुसार राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. तसेच तो रिपोर्ट 48 तास आधीचा असायला हवा. संवेदनशील भागातील कडक निर्बंध हे जुन्या आदेशानुसारच असणार आहेत. कारमधून दोनपेक्षा जास्त लोकांना प्रवास करता येणार नाही.
लॉकडाऊनच्या या काळात दूध व्यवसाय करणार्यांना तसेच घरपोच सेवा देणार्यांसाठी सूट देण्यात आली आहे. परराज्यातून माल वाहतूक करणार्या गाड्यांमध्ये फक्त दोनच जणांना प्रवास करता येईल. त्यांना आरटी पीसीआर टेस्ट करावीच लागणार आहे. दुकानांसह इतर व्यवसायांसाठी वेळही देण्यात आली आहे.
किराणा मालाची दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री, फळविक्री, अंडी, मटण, चिकन, मासेविक्री, कृषीसंबंधित सर्व सेवा, दुकाने, पशुखाद्य विक्री, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणार्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार आहेत.
औषधे आणि कोरोनाशी संबंधित सामुग्रीसाठी प्रवास करावा लागणार्या विमानतळ आणि बंदरावरील कर्मचार्यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून यासाठी निर्बंध लागू करण्याच्या 48 तास आधी नोटीस द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
केशव उपाध्ये यांचा घणाघात
राज्यातील लॉकडाऊन वाढल्यामुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सत्ताधारी पक्षावर घणाघाती टीका केली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी!..सामान्य माणसा, नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूच आहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वार्यावर सोडले आहे. तुझा इएमआय, तुझे घरखर्च, तुझे वीज बिल तूच पाहा, अशा शब्दांत केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.