शेतकर्यांना आर्थिक मदत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
100 वर्षांनंतर अशी भयानक साथ जगात आली आहे. आपल्यासमोर एक अदृश्य शत्रू आहे. अनेक लोक या कोरोनाच्या संकटातून जात आहेत. जनतेचे दुःख मला समजतेय, त्यांच्या वेदना मलाही जाणवताहेत. भारत अजूनही हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हरणार नाहीत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना धीर दिला आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील आठवा हप्ता शुक्रवारी (दि. 14) केंद्र सरकारकडून शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. 19 हजार कोटी रुपयांचा निधी शेतकर्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला असून, याचा लाभ साडेनऊ कोटी शेतकर्यांना होणार आहे. यानिमित्त पंतप्रधान मोदींनी शेतकर्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाच्या या संकटकाळात शेतकरी कठीण आव्हानाचा सामना करीत आहेत. त्यातही त्यांनी मोठे उत्पादन मिळवले असून, सरकारसुद्धा दरवर्षी एमएसपी खरेदीचे नवीन विक्रम करीत आहे. पहिल्यांदा धान्याची खरेदी व्हायची. आता गहूसुद्धा खरेदी होत आहे. आज अक्षय्य तृतीयेचा शुभ दिवस आहे. कृषी क्षेत्रासाठी ही नव्या सुरुवातीचा वेळ आहे. याच मुहुर्तावर जवळपास 19 हजार कोटी रुपये शेतकर्यांच्या खात्यावर थेट पाठवण्यात आले आहेत. याचा लाभ पश्चिम बंगालसह देशातील जवळजवळ 10 कोटी शेतकर्यांना होणार आहे.
कोरोना काळात भारतात जगातील सर्वांत मोठी मोफत धान्यांची योजना सुरू करण्यात आली. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत गेल्या वर्षी आठ महिने गरीबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले होते. या वर्षी मे आणि जूनमध्ये देशातील 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य देण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
देशातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते सगळे प्रयत्न करीत आहे, असे सांगून सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.
देशातील सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण केले जात आहे. यासाठी नोंदणी करा आणि लस अवश्य घ्या. लस आपल्याला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी बळ देईल. देशात आतापर्यंत 18 कोटी लोकांनी लस घेतली आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि खासदार या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या.