Breaking News

पनवेलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळा उभारणीला महासभेत मंजुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्याबाबत परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असा प्रस्ताव पनवेल मनपाचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी मांडला होता. गायकवाड यांच्या प्रस्तावाला गुरुवारी (दि. 20) शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित महासभेची मंजुरी मिळाली आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेचे आयोजन महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन स्वरूपात करण्यात आले होते. महासभेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नवा पुतळा

भविष्यात पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर उभारण्यात येण्यासंदर्भात परवानगीचा प्रस्ताव उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी मांडला होता. पनवेल हे रायगड जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. भविष्यात येथे रेल्वेचे मोठे जंक्शन उभे राहणार असून देशभरातून या ठिकाणी प्रवासी येणार असल्याने रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा. याबाबत परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असा प्रस्ताव उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी मांडला होता. गायकवाड यांच्या प्रस्तवाला महासभेची मंजुरी मिळाली आहे. हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी पुतळा समितीकडे पाठवण्यात आला आहे.

महासभेत शहरी भागात वास्तव्यास असणार्‍या गरीब नागरिकांना व्यवसायासंबंधित माहिती उपलब्ध व्हावी. या हेतूने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका (डेएनयुएलएम) अभियानांतर्गत कळंबोली येथील कालभैरव मंगल कार्यालयात शहर उपजीविका केंद्र स्थापन करण्याचा निर्णय पनवेल पालिकेमार्फत घेण्यात आला होता. गुरुवारच्या महासभेत कळंबोलीमधील जागेत केंद्र उभरण्याला प्रभाग समिती ‘ब’चे सभापती समीर ठाकूर, महिला व बालकल्याण समिती सभापती मोनिका महानवर, नगरसेवक विजय खानावकर यांनी विरोध दर्शवल्याने हा विषय स्थगित ठेवण्यात आला आहे.

महासभेदरम्यान आयुक्तांकडील कामकाजांतर्गत मांडण्यात आलेल्या 2021-22, 2022-23 व 2023-24 करिता पावसाळ्यापूर्वी आपत्कालीन स्थितीत नालेसफाई करण्यासाठी 10 कोटी 81 लाख 20 हजार 335 रूपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबवून त्याला मंजुरी देण्यासाठी पाटलावर घेण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या वेळी सर्वपक्षीय सदस्य आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, तसेच सिडको वसाहतीत सिडकोमार्फत योग्य रीतीने नालेसफाई करण्यात येत नसल्याबाबत भाजप नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका मोनिका महानवर यांनी नाराजी व्यक्त केली, तर नालेसफाईची निविदा तीन वर्षांकरिता न राबवता दरवर्षी प्रभाग समितीनुसार नव्याने निविदा राबवण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक हरेश केणी यांनी केली.

या वेळी बोलताना नगरसेवक बबन मुकादम यांनी नालेसफाईसाठी या अगोदर नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून जेसीबी मशीन वापरासंदर्भात देण्यात आलेल्या दरांवर संशय व्यक्त करण्यात आला. या दरम्यान महापौरांनी संबंधित अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply