Breaking News

अतिवृष्टीमुळे मुरूड तालुक्याची वाताहत

मुरूड तालुक्यात आतापर्यंत 3769 मिमी एवढा प्रचंड पाऊस झाल्याने संपूर्ण तालुक्याला यामुळे मोठी हानी सहन करावी लागली आहे. ग्रामीण व शहरातील रस्त्यांची दैना उडाली असून मुंबई शहराला जोडणार्‍या पुलांचासुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काशीद येथील पूल वाहून गेल्याने अलिबाग-मुरूड येथील वाहतूक तब्ब्ल 20 दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे एसटी आगाराचे दिवसाला साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

रस्त्यांची चाळण

मुरूड तालुक्यात जुलै महिन्यात एका दिवसाला 353 मिमी व तद्नंतर सप्टेंबर महिन्याच्या 8 तारखेला एका दिवसात 475 मिमी एवढा प्रचंड पाऊस झाला. सततच्या पावसामुळे नदीकाठच्या व डोंगर भागात राहणार्‍या लोकांना इतर ठिकाणी हलविण्यात आले होते, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र तालुक्यातील रस्ते व पुलांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वसाधारणपणे श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते, परंतु यंदा या महिन्यातसुद्धा मुसळधार पाऊस बरसल्याने तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. सर्व शेती पाण्याखाली गेली होती. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे  अनेक ठिकाणी रस्त्यांचा भराव वाहून गेला, तर काही ठिकाणी रस्तेच खचले. मोठमोठे खड्डे पडून तालुक्यातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे.

मुरूड तालुक्यातील उसरोली टेप ते उसरोली गाव या रस्त्याचा डाव्या बाजूकडील दगडी भराव पाण्याच्या मार्‍यामुळे वाहून गेला असून तेथे फक्त आता मातीचा थर राहिला आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रस्ते नादुरुस्त झाले असून पाऊस थांबताच सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

अतिवृष्टीमुळे मुरूड तालुक्यातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाला देण्यात आली आहे, तसेच रस्ते दुरुस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच या कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती  सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुरूड येथील उपअभियंता एस. गणगणे यांनी दिली.

मुरूड शहरालासुद्धा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जुनी पेठ ते दस्तुरीनाका हा रस्ता एवढा खड्डेमय झाला आहे की या रस्त्यावर नेहमीच छोटेमोठे अपघात होत असतात. शहरातील गावदेवी पाखाडी, सबनीस आळी, शेगवाडा, भोगेश्वर पाखाडी आदी भागातील रस्तेसुद्धा खड्डेमय झाले असून नगर परिषदेकडून त्यांची दुरुस्ती होत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

पूल झाले धोकादायक

मुंबई-मुरूडला जोडणार्‍या मुख्य रस्त्यावरील चिकणी पुलाच्या पुढील भागातील भराव वाहून गेल्यामुळे तेथे केवळ अर्धा अधिक रस्ता उरला आहे. काही दिवसापूर्वीच विहूर पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. नेमकी तीच बाजू अतिवृष्टीत वाहून गेल्याने या पुलाच्या डाव्या बाजूला मोठा खड्डा पडला आहे. या पुलावरून केवळ उजव्या बाजूने वाहतूक सुरू आहे. या पुलाचे काम जलद गतीने होणे खूप आवश्यक आहे अन्यथा पावसामुळे येथील खड्डा मोठा होत जाईल व हा पूल वाहतुकीस बंद करावा लागेल. तसे झाल्यास मुरूडचा मुंबई, अलिबाग बरोबरचा संपर्क तुटेल.

उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील अदाड गावाला जोडणारा पूल अतिवृष्टीमुळे कमकुवत झाला असून या पुलाचे संरक्षक कठडे व पुलाखालील काँक्रिट वाहून गेल्याने लोखंडी सळ्या दिसू लागल्या आहेत. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. या ठिकाणी नवीन पूल बांधण्याची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.

निधी प्राप्त होताच अदाड पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बारदासकर यांनी दिली.

मच्छीमारांचेही नुकसान

एकदरा पुलाजवळ मच्छीमार आपल्या बोटी दोरखंडाने बांधून ठेवतात, परंतु रात्रीच्या वेळी पावसाचा वेग वाढल्याने एकदरा खाडीतील पाण्याचा प्रवाह एवढा वाढला की चार बोटींचे दोरखंड तुटले. त्यामुळे दोन बोटींना जलसमाधी मिळाली, तर दोन बोटी महत्प्रयासाने किनार्‍यावर आणण्यात यश मिळाले, मात्र धंनजय पद्माकर पाटील यांची मोठी बोट आणि संजय जंजीरकर यांची तीन सिलिंडरवाली बोट बुडाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील नुकसान झालेल्या बोटींचे पंचनामे करण्यात आले आहेत. नुकसानीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून संबंधित मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे मुरूड तालुक्याचे मत्स्यविकास व परवाना अधिकारी तुषार वाळुंज यांनी सांगितले.

-संजय करडे, खबरबात

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply