मुंबई ः प्रतिनिधी
टीम इंडियाचा माजी कॅप्टन व ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असणारा राहुल द्रविड लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार आहे. द्रविड सध्या बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. तो यापूर्वी टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा प्रशिक्षक होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने अंडर-19 वर्ल्डकपही जिंकला आहे. टीम इंडियाच्या नव्या पिढीतील बहुतेक खेळाडू द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत.
राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार असला तरी तो विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्रींची जागा घेणार नाही. टीम इंडिया जुलैत श्रीलंकेचा दौरा करणार आहे, पण या दौर्याबाबत अजूनही संभ्रमावस्था कायम आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत संपूर्ण नवी टीम इंडिया श्रीलंकेला जाणार आहे. या टीमचा कॅप्टन अजूनही नक्की नाही. शिखर धवन, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार व श्रेयस अय्यर ही चार नावे कॅप्टनपदाच्या शर्यतीत आहेत, मात्र टीमचा प्रशिक्षक राहुल द्रविड असेल, असे बीसीसीआयने निश्चित केल्याचे समजते. श्रीलंका दौर्यावेळी रवी शास्त्रींसह संपूर्ण कोचिंग स्टाफ हा इंग्लंडमध्ये असेल. त्या वेळी नव्या टीमला प्रशिक्षण देण्यासाठी राहुल द्रविड हेच योग्य नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.