Sunday , October 1 2023
Breaking News

‘जेट’ वैमानिकांचे मोदींना साकडे; कंपनीतील 20 हजार नोकर्या वाचवण्याची साद

मुंबई ः प्रतिनिधी

आर्थिक संकट कोसळल्याने ’जमिनीवर’ आलेल्या जेट एअरवेज कंपनीच्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या देशांतर्गत वैमानिकांच्या संघटनेने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले आहे. विमान कंपनी वाचवण्यासाठी 1500 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती बँकेकडे केली आहे, तर कंपनीतील 20 हजार नोकर्‍या वाचवा, असे साकडे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घातले आहे. 

जानेवारीपासूनचे वेतन थकल्याने हतबल झालेल्या या कंपनीच्या वैमानिकांनी सोमवारपासून ’उड्डाण बंद’ आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला होता, पण कंपनीचे आर्थिक नियोजन करणार्‍या स्टेट बँकेशी चर्चा करण्याचे आश्वासन वैमानिकांना व्यवस्थापनाकडून देण्यात आले. त्यामुळे रात्री उशिरा हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचे वैमानिकांनी ठरवले. कंपनी सुरळीत चालवण्यासाठी आर्थिक नियोजन करणार्‍या बँकेने 1500 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी विनंती आम्ही करतो, तसेच 20 हजार नोकर्‍या वाचवा, अशी आमची पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे, असे नॅशनल एव्हिएटर्स गिल्डचे उपाध्यक्ष आदिम वालियानी यांनी सांगितले आहे. विमानांची दुरुस्ती आणि तपासणी करणार्‍या फ्लाइट इंजिनीअरांनीही वैमानिकांना पाठिंबा देत सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक संकटामुळे जेटच्या कर्मचार्‍यांना वर्षभरापासून अनियमित वेतन दिले जाते. वैमानिक व फ्लाइट इंजिनीअरांना दर तीन महिन्यांनी एका महिन्याचे, तर अन्य कर्मचार्‍यांना दोन महिन्यांतून एकदा वेतन दिले जात होते, पण आता वैमानिक व फ्लाइट इंजिनीअरांना जानेवारीपासून वेतन मिळालेलेच नाही. यामुळे त्यांना कुटुंबाचा खर्च चालवणे कठीण झाले आहे. याच्या निषेधार्थ वैमानिकांनी 1 एप्रिलपासूनच संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता, पण व्यवस्थापनाला निर्णय घेण्यासाठी 15 दिवसांचा अवधी देण्यात आला होता.

– नागपुरात जेटचे कार्यालय सुरू, पण उड्डाण बंद

जेट एअरलाइन्स कंपनी आर्थिक संकटात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेट एअरवेज कंपनीचे कार्यालय सुरू आहे, पण उड्डाणांचे संचालन बंद आहे.

जेटची नागपुरातून मुंबई, दिल्ली, अलाहाबाद आणि इंदूरसाठी दररोज सात विमाने होती. दोन दिवसांपूर्वी नागपुरातून अलाहाबादला सुरू असलेले एकमेव उड्डाण रद्द झाल्यानंतर आता सर्वच उड्डाणाचे संचालन बंद आहे. अलाहाबाद उड्डाण 5 मेपर्यंत रद्द करण्यात आले आहे. कंपनीचे मुंबईला तीन, दिल्लीसाठी दोन आणि अलाहाबाद व इंदूरकरिता एक-एक उड्डाण होते. फेब्रुवारीत मुंबईची दोन आणि दिल्लीची दोन उड्डाणे 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली होती. एप्रिलमध्ये सुरू झाल्यानंतर पुन्हा टेक ऑफ झाले नाही. त्यानंतर हळूहळू सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. यादरम्यान अनेक प्रवासी विमानतळावर पोहचतात आणि नाराजी व्यक्त करतात. पूर्वी बुकिंग केलेल्यांना रिफंड देण्यात येत आहे, तर काहींना दुसर्‍या कंपनीच्या विमानात जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जेटने विदेशातील सर्व उड्डाणेही बंद केली आहेत. गुरुवारी कंपनीच्या विमानांची संख्या 14वर आली आहे. पूर्वी कंपनीच्या ताफ्यात 123 विमाने होती. आर्थिक संकटामुळे वैमानिकांचे वेतन देण्यास कंपनी असमर्थ आहे. उड्डाण नसल्यामुळे कंपनीच्या तोट्यात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे नागपूर विमानतळावरील काऊंटर बंद होऊ शकते.

Check Also

भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी गुरुवारी (दि. 10) …

Leave a Reply