तरीही खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
पाली : प्रतिनिधी
पाली सुधागडसह जिल्ह्यात सध्या ताडगोळे काही प्रमाणात विक्रीसाठी येऊ लागले आहेत, मात्र गेल्या वर्षी 100 रुपयांना एक डझन मिळणारे ताडगोळे यंदा 100 रुपयांना आठ किंवा नऊ मिळत आहेत. ताडगोळ्यांचा हंगाम सुरू होण्यास अवकाश आहे. शिवाय वातावरणातदेखील बदल झाला आहे. त्यामुळे उत्पादन कमी होऊन किमती वाढल्या आहेत. तरीही हंगामात पहिल्यांदा आलेले ताडगोळे खवय्ये आवर्जून खात आहेत.
जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड आदी तालुक्यांत ताडगोळ्यांचे मुबलक उत्पादन होते. तेथून काही विक्रेते जिल्ह्यात इतरत्र ताडगोळे विक्रीसाठी जातात, तर काही जण छोट्या गाडीत ताडगोळे घेऊन विविध बाजारात जातात किंवा महामार्गाच्या कडेला विक्रीसाठी बसतात. ग्राहक आल्यावर त्यास आवरण काढून ताजे ताडगोळे काढून दिले जातात. यामुळे ग्राहक खुश होतात. ताडगोळे हे हंगामी फळ आहे. उन्हाच्या काहिलीपासून दूर राहण्यासाठी थंडगार व मधुर ताडगोळे खायला सर्वांना आवडतात. शरीराला थंडावा देण्यासाठी बहुतांश लोक ताडगोळे खरेदी करीत आहेत.
चविष्ट, गुणकारी व आरोग्यदायी
ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह, झिंक, पोटॅशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम असे अनेक गुणधर्म असतात. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यास ते उपयुक्त ठरतात. मधुमेही व हृदयविकार असलेली माणसेदेखील ताडगोळे खाऊ शकतात. सध्या कोरोनाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अनेक जण ते खातात. ताडगोळ्याने शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहते, ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. गॅस होणे, अपचन, पोटदुखी, जळजळ, बद्धकोष्ठता, मूळव्याध असे त्रास मी होतात. शारीरिक थकवा कमी होतो.
उत्पादन कमी तसेच हंगाम सुरू होण्यास अवधी असल्याने या वर्षी ताडगोळ्याची किंमत वाढली आहे. छोटा पीकअप टेम्पो घेऊन महामार्गाच्या कडेला आम्ही ताडगोळ्यांचा विक्री करतो. लोक आवर्जून खरेदी करतात.
-महेंद्र खारकर, ताडगोळे विक्रेता