Breaking News

हिंसाचारामागे कोण?

समाजमाध्यमे कशाप्रकारे माथी भडकवू शकतात याचे प्रत्यंतर गेले दोन-तीन महिने महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा येत आहे. जाणून-बुजून राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, का असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील ताज्या हिंसाचारानंतर उपस्थित केला आहे, तो रास्तच म्हणावा लागेल.

कोल्हापुरात मंगळवारी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असतानाच काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस आपल्या मोबाइलवर ठेवल्यामुळे स्वाभाविकपणे तिथे संतप्त प्रतिक्रिया उमटली आणि अखेर बुधवारी तिथे दंगलीचा भडका उडाला. या अशा माथी भडकवणार्‍या स्टेटसविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत हजारो कार्यकर्ते व नागरिक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर जमावाने जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक, तोडफोड सुरू केली. दोन्ही बाजूचे लोक समोरासमोर आल्याने अखेर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार करावा लागला. त्यानंतर दिवसभर कोल्हापुरात अतिशय तणावपूर्ण परिस्थिती होती. सायंकाळनंतर परिस्थिती नियंत्रणात आली तरी पूर्ण जिल्हा बंद असल्याचे दिसून आले. बुधवारच्या घडामोडींनंतर कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला असून शहरातील दंगलप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापुरातील हिंसाचारानंतर नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, औरंगजेबाच्या एवढ्या अवलादी अचानक कशा जन्मल्या याचा शोध घ्यावा लागेल. जाणूनबुजून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काहींचे प्रयत्न सुरू आहेत. हे कोण करीत आहे हे तपासून बघावे लागेल, असे प्रतिपादन केले. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून निरनिराळ्या शहरांमध्ये असे जातीय तणाव निर्माण होताना दिसले आहेत. समाजमाध्यमांचा वापर करून सर्वसामान्यांची माथी भडकावण्याचा डाव खेळला जात आहे. छत्रपती संभाजीनगरापाठोपाठ मुंबईतील मालवणी, जळगाव, अकोला, नगर-शेवगाव, त्र्यंबकेश्वर, संगमनेर येथेही असा प्रयत्न झाला. गुरूवारी कोल्हापुरच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेटस ठेवणार्‍या ज्या सहा तरुणांना अटक करण्यात आली आहे ते सारे कॉलेजला जाणारे तरुण आहेत. सर्व जण अल्पवयीन आहेत. एकमेकांची स्टेटस त्यांनी कॉपी केली असे आढळून आले असून त्यांना कुणी फूस लावली होती का याचा शोध पोलीस घेत आहेत. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांना महाराष्ट्रात माफी नाहीच या भूमिकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला आहे तर विरोधीपक्षाच्या नेत्यांकडून मात्र याप्रकरणी उलट सरकारवरच टीका करण्यात आली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी उसळत असलेल्या हिंसाचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गंभीर दखल घेतली आहे. कायदा हातात घेणार्‍या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. कोल्हापुरात विरोधीपक्षाच्या एका नेत्याने दंगल घडविण्यात येणार आहे असे म्हणताच पाठोपाठ औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्या उदात्तीकरणाच्या घटना कशा घडल्या? या घटना आणि संबंधित विधान यांचा काही संबंध आहे का? अचानक कोण पुढे आले आणि त्यांना कोणाची फूस आहे याची चौकशी करण्यात येईल, असे फडणवीस यांनी म्हटले असून राज्यात नेमके आताच अनेक जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण का होताना दिसते आहे याच्या मुळाशी जाण्याची निश्चितच गरज आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply