’भारतीय व्हेरियंट’वरून भाजप नेते प्रकाश जावडेकर आक्रमक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी कोरोनाच्या व्हेरियंटवरून केलेल्या एका विधानावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे. काँग्रेसने भारताचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस नेते कमलनाथ यांनी नुकतेच म्हटले होते की, माझा भारत महान आहे हे आता विसरुन जा कारण आता भारत कोविडयुक्त बनला आहे. तसेच कोरोना महामारी सुरुवात चायनीज व्हेरियंटनी झाली होती आणि आता ती भारतीय व्हेरियंटवर येऊन पोहचली आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रप्रतींना भारतीय व्हेरियंटची काळजी सतावत आहे.
कमलनाथ यांच्या ’भारतीय व्हेरियंट’ या कमेंटवर प्रतिक्रिया देताना जावडेकर म्हणाले, काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही अशी स्टेटमेंट्स केली आहेत. तर डब्ल्युएचओने स्पष्टपणे म्हटले आहे की, कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटला कुठल्याही देशाचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे भारतीय व्हेरियंट संबोधने हा भारताचा अपमान आहे. यावरून देशातील सर्वांत मोठा पक्ष केवळ देशाचा अपमानच करत नाहीए तर कोरोनाविरोधातील लढा कमजोर करत आहे. त्याचबरोबर काँग्रेसने भारत बायोटेकच्या लसला ’भाजपची लस’ असे संबोधले होते यावरूनही भाजपाने काँग्रेसला टार्गेट केले आहे.
जेव्हा कोवॅक्सिन लस पहिल्यांदा समोर आली त्यावेळी काँग्रेसने त्याला ’भाजपची लस’ असे संबोधले होते, पण ही लस अधिक कार्यक्षम असल्याचे सिद्ध आता झाले आहे. आता काँग्रेसने नवा प्रचार सुरू केला आहे, तो म्हणजे ज्यांनी कोवॅक्सिन लस घेतली आहे. त्यांच्यावर परदेश प्रवासावर बंदी येऊ शकते कारण इतर देशांमध्ये या लशीला मान्यता देण्यात आलेली नाही. पण डब्ल्युएचआने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असेही जावडेकर यांनी या वेळी स्पष्ट केले.